Home चंद्रपूर इशारा :- जिल्ह्यातील सिमा तपासणी नाके बंद न केल्यास मनसेचे खळखट्याक आंदोलन.

इशारा :- जिल्ह्यातील सिमा तपासणी नाके बंद न केल्यास मनसेचे खळखट्याक आंदोलन.

मनसे वाहतूक सेनेचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांना निवेदन देऊन दिला इशारा.

 

केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके (चेक पोस्ट) बंद करण्याबाबत परिवहन आयुक्तांना परिपत्रक दिले होते. मात्र तरी सुद्धा सीमा तपासणी नाके बेकायदेशीरपणे आगाऊचे पैसे घेऊन एक वर्षांपासून सुरु आहे, यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्य सीमेवर कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर वसुल जड वाहन धरकांकडून करत असून दरमहा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याने ते त्वरित बंद करा अन्यथा खळखट्याक आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार व उमाशंकर तिवारी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना दिला आहे.

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत केंद्रातर्फे राज्यातील परिवहन आयुक्तांना जवळपास तीन पत्र देऊन तसे सन 2022 ला परिपत्रक देण्यात आले होते आणि त्या दरम्यान राज्य शासनाने एक अभ्यास गट तयार करून त्या अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सुचविले होते.

या दरम्यान राज्य शासनाने नेमकी काय भूमिका घेतली हे अजूनही गुलदस्त्यात असून ज्याअर्थी सर्व कर ऑनलाईन झाल्यानंतर आता चेकपोस्ट वर कुठलाही कर घेण्यात येऊ नये अशी केंद्र शासनाची भूमिका असल्याने सर्व सिमा तपासणी नाके बंद करणे अपेक्षित होते, पण चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवर आरटीओचा नाका अजूनही सुरू असुन इथे एका कंपनीचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून वजन काटा तपासणीचा कर घेतात तर आरटीओ च्या कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून एन्ट्री फी च्या माध्यमातून दररोज जवळपास ७०० ते ८०० वाहन चालकांकडून ५०० ते ७०० रुपये प्रती गाडी असे मिळून जवळपास ३ लाख ते ४.५ लाख रुपयांची अतिरिक्त अवैध वसुली इथे केली जातं आहे. त्यामुळे या सीमा नाक्यावर गोळा होणारा पैसा नेमका जातो कुठे यांची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांना द्या. कारण जवळपास एका वर्षांपासून ही रक्कम १२ ते १५ कोटींच्या घरात जमा झाली ती गेली कुठे याचा हिशोब आपल्याकडे आहे का ? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ मोरे यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

मागील अनेक वर्षांपासून आरटीओ कार्यालयात मोठा भ्रष्टाचार शिस्तबद्ध पद्धतीने केला जातो व त्यात राजकीय पुढारी आणि मोठे पत्रकार यांना त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार मैनेज करून जणू या भ्रष्टाचाराला राजाश्रय मिळवून बेकायदेशीरपणे भ्रष्टाचार करत आहे, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाहन केले आहे की येत्या पंधरा दिवसात हे सगळे भ्रष्टाचाराचे प्रकार थांबवण्यात यावे अन्यथा जिल्ह्यातील सिमा तपासणी नाके बंद करण्यासाठी मनसेतर्फे खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार. उमाशंकर तिवारी. मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे व इतर पदाधिकारी उपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here