Home चंद्रपूर आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन डॉ. विकास आमटे...

आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन डॉ. विकास आमटे यांची घेतली भेट

आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू

ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

डॉ. विकास आमटे यांची घेतली भेट

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :-दि १० एप्रिल २०२४ : श्रद्धेय बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. त्यातून मानवमुक्तीचे स्वप्न पाहिले. मानवमुक्तीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाबा आमटेंनी आनंदवनाचा दुर्मिळ प्रयोग साकारला. डॉ. विकास आमटे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तो आत्मीयतेने पुढे घेऊन जात आहेत. हा प्रयोगशील प्रवास दिसतो तेवढा सोपा नाही. त्यामुळे आनंदवन हे जीवन जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या आनंदवन येथे भेट देऊन सचिव डॉ. विकास आमटे यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी ते चर्चेदरम्यान बोलत होते. पुढे बोलतांना ना. मुनगंटीवार म्हणाले की, आज मी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवीत असून आज आपले आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहे. मला आमटे कुटुंबियांकडून नेहमीच आपुलकी व प्रेम मिळाले आहे. प्रेम इथे आल्यावर मला काम करण्याची अधिक ऊर्जा मिळते. शिकल्या-सवरलेल्या शहरी माणसाला लाजवतील अशी कामे या आणि अशा अनेकांनी आनंदवनात आजवर साकारली आहेत. डॉ. विकास आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती साथ देत नसली असली तरीही या आजाराला सकारात्मकरित्या तोंड देण्याची त्यांची जिद्द आणि या परिस्थितीत देखील आयुष्य समृद्धपणे जगण्याची इच्छा त्यांच्या देहबोलीतून जाणवली, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

आज आनंदवन हे भलंमोठं कुटुंब आहे. हे कुटुंब यांत्रिकीकरणाच्या आहारी न जाता नांदत आहे. मूलभूत गोष्टींसाठीचा संघर्ष काय असतो, हे न कळणारी तरुण पिढी या माणसांकडून खूप काही मिळवू शकते. मला वाटतं, हे सगळे आजच्या तरुणांना कळणे आवश्यक असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले. त्यावर महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे म्हणाले की, माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या सोबत आहे. आपल्या सारखा कर्तुत्ववान अभ्यासू लोकनेता लोकसभेत निवडून दिला तर या जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केला. आनंदवन येथे आगमन होताच दिव्यांग कवी रमेश बोपचे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेली सुंदर कवितेची फोटोफ्रेम भेट दिली. त्यानंतर त्यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू,कवीश्वर काका, राजेश ताजने, सदाशिव ताजने, बाबा भागडे, रमेश राजूरकर, नितीन मत्ते किशोर टोंगे, डॉ. भगवान गायकवाड, शुभम चांभारे, आशिष ठाकरे, सागर कोहळे, बाळू पिसाळ, अमित चावले, अविनाश कुळसंगे, शरद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

*श्रद्धेय बाबांच्या समाधी स्थळाला भेट…*

आनंदवन येथे भेट दिल्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धेय बाबा आमटे, श्रीमती साधनाताई आमटे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here