माजरी येथील विषबाधा झालेल्या व्यक्तींच्या दुःखात मी सहभागी : ना. सुधीर मुनगंटीवार
बाधित व्यक्तींना उत्तम उपचार देण्याचे प्रशासनाला निर्देश
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. १४ :माजरी येथील दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर दुर्दैवाने या महाप्रसादातून काही जणांना विषबाधा झाली. यामध्ये जवळपास ८० जण बाधित झाले. या सर्वांना वरोरा व चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी २४ जणांना उपचाराअंती बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.
दुर्दैवाने यात गुरुफेक राम यादव नामक ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आपल्याला अतिशय दुःख झाले आहे, असे नमूद करीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मृत व्यक्तीच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. त्यांना यथायोग्य शासकीय मदत मिळावी, यासाठी व रुग्णालयात भरती रुग्णांना उत्तम उपचार मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी निर्देशही दिले आहेत.