Home चंद्रपूर सिएसटीपीएसच्या हद्दीतुन शहरात येणा-या नाल्यांची सफाई करण्यास मनपा ला अडथळा निर्माण करु...

सिएसटीपीएसच्या हद्दीतुन शहरात येणा-या नाल्यांची सफाई करण्यास मनपा ला अडथळा निर्माण करु नका – आ. किशोर जोरगेवार सिएसटीपीएस ला सूचना, द्वारका नगरी येथील नाले सफाईची केली पाहणी

सिएसटीपीएसच्या हद्दीतुन शहरात येणा-या नाल्यांची सफाई करण्यास मनपा ला अडथळा निर्माण करु नका – आ. किशोर जोरगेवार

सिएसटीपीएस ला सूचना, द्वारका नगरी येथील नाले सफाईची केली पाहणी

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-तुकुम प्रभागातील द्वारका नगरी येथील नाले सफाईच्या कामात सिएसटीपीएस प्रशासन अडथळा घालत असल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील नाले सफाईच्या कामाची पाहणी केली असुन सिएसटीपीएसच्या हद्दीतुन शहरात येणा-या नाल्यांची सफाई करण्याची परवानगी मनपा प्रशासनला मिळवुन दिली आहे. त्यानंतर येथील मान्सून पूर्व नाले सफाई मोहिमेला गती मिळाली आहे. यावेळी वामन बुटले, प्रशांत भारती, दिलीप जमदाडे, जयंत गाडे यांच्यासह मनपा अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.
मागच्या वर्षी चंद्रपूर शहराला पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला होता. सोबतच अनेक भागात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. या भागाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत उपाययोजना केल्या होत्या. तुकुम येथील द्वारका नगरी या भागातही नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. हा भाग सिएसटीपीएसच्या हद्दीलगत आहे. या भागातुन वाहणारा नाला हा सिएसटीपीएसच्या हद्दीतून नागरी वस्तीत येतो. दरम्यान मनपाची मान्सुनपुर्वी नाले सफाई मोहीम सुरु असतांना सिएसटीपीएसच्या हद्दीतील नाल्याची सफाई करण्याची परवानगी मनपा प्रशासनाला मिळत नव्हती. परिणामी यंदाही या भागात नाल्याचे पाणी शिरेल अशी भिती नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे व्यक्त केली.
सदर बाब लक्षात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाच्या अधिका-यांसह द्वारका नगरी येथे जात नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी सदर नाला हा सिएसटीपीएसच्या हद्दीत असल्याने तेथे सिएसटीपीएसच्या परवानगी शिवाय मनपा नाल्याची सफाई करु शकत नसल्याचे लक्षात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी लगेच सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता गिरिश कुमरवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या भागात मनपा प्रशासनाला नाले सफाई करण्याची परवानगी देण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर सदर परवाणगी मनपा प्रशासनाला देण्यात आली आहे. आता पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारी झाडी झुडपी काढण्यात येत असून नाल्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here