Home धार्मिक बौद्धिक :- आषाढी एकादशी निमित्ताने लाखों भक्त पंढरपूरला का जातात?

बौद्धिक :- आषाढी एकादशी निमित्ताने लाखों भक्त पंढरपूरला का जातात?

ही प्रथा कुणी सुरू केली, कोण आहेत ते पहिले वारकरी, काय आहे पालखीची संकल्पना, पालखीचा काय आहे संदेश? जाणून घ्या.

न्यूज नेटवर्क –

पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या कानकोपऱ्यातून लाखो वारकरी हे आळंदीहुन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत तर देहू येथून तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जात असतात. तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदा हे 339 वे वर्ष आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 वे वर्ष आहे. पण या वारीचा इतिहास नेमका आहे, वारी का काढली जाते, या वारीचा पहिला वारकरी कोण आहे, ही प्रथा कशी रूढ झाली ते ऐकून आश्चर्य वाटेल.

पंढरपूरला जाणाऱ्या या पालखी सोहळ्याची सुरूवात श्री. संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तपोनिधी श्री. नारायण महाराज यांनी 1685 मध्ये केली, अशी माहिती विठोबा संस्थान सेवक रविंद्र पाद्य यांनी दिली आहे. श्री नारायण महाराजांनी ज्येष्ठ वद्य अष्टमीला देहूगावातून निघणाऱ्या दिंडीवाल्यांच्या खांद्यावर पालखी दिली. या पालखीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून दिंडी आळंदीला गेली. तेथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि वारकरी ज्ञानोबा तुकाराम नामाचे भजन करीत पंढरपूरला नेली. पुढे ही प्रथा पडली व आजही ही प्रथा तशीच सुरू आहे. दिवसेंदिवस पालखी सोबत समाज वाढत गेला. या नंतर ही दिंड्या वेगवेगळ्या झाल्या आहेत.

आषाढी एकादशीचे काय आहे महत्त्व?

आषाढ महिना सुरु झाला की, वारकरी संप्रदायांना आपल्या देवाला भेटण्याची आस लागते. टाळ, मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा यांच्या अभंगावर पावले टाकत लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या नदीत स्नान करुन विठ्ठालचे दर्शन घेण्याला अधिक महत्त्व आहे.

काय आहे पालखीची संकल्पना?

संत तुकाराम महाराजांचे बंधू श्री नारायण महाराजांनी सुरुवातीला काही काळ परंपरेप्रमाणे पंढरपूर वारी सुरू ठेवली. ते कल्पक आणि उपक्रमशील असल्याने त्यांनी वारकरी संप्रदायात पालखीची नवीन प्रथा सुरू केली. मध्ययुगात पालखीत बसणे हा सर्वोच्च मान होता. तोच मान संतांना मिळावा, ही संकल्पना घेऊन वारकरी संप्रदायात पालखी सोहळा सुरू केला. सोहळ्यासोबतच किमान 5 ते 6 लाख भाविक पायी चालत वारी करतात. या सर्व भाविकांना सोयी सुविधा पुरविताना प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. पालखी सोहळा केवळ श्री संत नारायण महाराजांमुळे सुरू झाल्याने वारकरी संप्रदाय एकसंघ बांधलेला पहायला मिळत आहे. याचे श्रेय श्री नारायण महाराजांना जाते.

काय आहे वारीचा संदेश?

श्री संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा यांच्यापासून पंढरीची वारी त्यांच्या घरात होती. परंतु पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरला नेण्याची परंपरा आणि त्याची खरी सुरुवात ही तपोनिधी नारायण महाराजांनी केली आहे. आज हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होतात आणि वर्षभर ही ऊर्जा मिळत राहते. संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांची भावंड, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, चोखामेळा, गोरा कुंभार या सर्व संतानी भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. पंढरपूरचे तसेच भागवत धर्म आणि भगवद्गीतेचे महत्व लोकांना पटावं म्हणून ही वारी सुरू झाली आहे. सगळ्यांनी सुखी रहा, सांभाळून रहा आणि एकमेकांना सहकार्य करा, हा संदेश वारीमध्ये दिला जातो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here