आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तरुणाईला सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – आ. किशोर जोरगेवार
रेनायसंस कॉलेज येथील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-तरुणाईला सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास हा अत्यावश्यक घटक असून सुरू झालेले हे केंद्र त्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. आज या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन झाले आहे. हे समाजाच्या प्रगतीच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पाउल असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
रेनायसंस इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ऑनलाइन प्रणालीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रा. जे. एफ. सुर्या, प्रा. डॉ. सुभाष, ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता लोखंडे, नितीन पुगलिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. आपल्यातील कितीतरी तरुण उच्च शिक्षण घेतात, मात्र त्यांच्याकडे त्या शिक्षणाला पूरक कौशल्यांचा अभाव असतो. हेच कौशल्य त्यांना उद्योग, व्यवसाय, किंवा सेवाक्षेत्रांमध्ये यश मिळवून देऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या विचारसरणीमध्ये कौशल्याला अत्यंत महत्त्व दिले होते, आणि त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा केंद्र सरकार प्रयत्न आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी केवळ पदवी पुरेशी नसून, त्यांच्याकडे कौशल्य असणे ही गरजेचे आहे. या पदवी आणि कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर करू शकतात. यासाठीच सरकारकडून कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.
“व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी महाराष्ट्रात एकूण 1000 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू होत आहेत. यात आपल्या कॉलेजचा समावेश करण्यात आला असून, या कौशल्य केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचा विकास होणार आहे,” असे आ. जोरगेवार म्हणाले.
“तरुणाईला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कौशल्यांची पूर्तता करणे हा या उपक्रमामागचा मूळ उद्देश आहे. इथे विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे कोर्सेस असणार आहेत, जे व्यावसायिक, तांत्रिक, औद्योगिक, आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये तरुणांना घडवणार आहेत. यातून केवळ नोकरीची संधी मिळवण्याचे प्रशिक्षण नव्हे, तर स्वतःचा उद्योग उभारण्याची आणि रोजगार निर्मितीची प्रेरणा दिली जाणार आहे,” असे आ. जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.