Home चंद्रपूर सेवाभावी डॉक्टर आरोग्य सेवेचा आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडच्या...

सेवाभावी डॉक्टर आरोग्य सेवेचा आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित

सेवाभावी डॉक्टर आरोग्य सेवेचा आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-डॉक्टर हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सेवेमुळे, रुग्णांना नवजीवन मिळते, त्यांच्या आयुष्याला नवी उमेद मिळते, आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळतो. आजही अनेक डॉक्टर सेवाभावी भावनेतून सेवा देत आहेत, हे सेवाभावी डॉक्टरच आरोग्य सेवेचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील डॉक्टरांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. प्रविण पंत, डॉ. शरद सालफडे, डॉ. अशोक वासलवार, डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. टोंगे, श्याम गुंडावार, होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर जोगी, डॉ. दाबेरे, निमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जितेश खोब्रागडे, डॉ. राजू ताटेवार, निमा असोसिएशनच्या महिला अध्यक्षा डॉ. सिमला गायनलवार, जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भूपेंद्र लोढीया, सचिव सिराज खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉक्टरांची ही सेवा कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. वैश्विक महामारी, नैसर्गिक आपत्तीमध्ये डॉक्टरांची सेवा सुरू असते. मागील पाच वर्षांत आपण शहर आणि ग्रामीण भागात मोठी आरोग्य शिबिरे घेतली आहेत. या आरोग्य शिबिरांमध्ये डॉक्टरांचे मोठे सहकार्य आम्हाला लाभले. आपल्या व्यस्ततेतही आपण या आरोग्य शिबिरांमध्ये आपली सेवा दिली. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
“आपल्या आव्हानांची आणि गरजांची जाणीव लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेचाही प्रश्न मागील काही घटनांमधून निर्माण झाला आहे, त्या दिशेने राज्य सरकार काम करत आहे. आपल्यासमोर आरोग्य सेवेत येणारी आव्हाने खूप मोठी असतात. जगभर पसरलेली महामारी अथवा एखादी नैसर्गिक आपत्ती, डॉक्टरांची सेवा कधीही थांबत नाही. अशा कठीण परिस्थितीत आपले धैर्य, समर्पण, आणि कर्तव्यनिष्ठा यांचे खूप कौतुक वाटते,” असे ते स्नेहमिलन कार्यक्रमात बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला विविध डॉक्टर संघटनांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here