चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई: फ्रेंड्स बार आणि राहुल धाबासह १५ प्रतिष्ठानांवर कायदेशीर कारवाई
चंद्रपूर :- शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ७ मार्च रोजी पिंक पॅराडाईज बारमध्ये झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने कडक उपाय योजना सुरु केली. या घटनेनंतर नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला, आणि त्यानुसार शहरातील एकूण १५ प्रतिष्ठानांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
News reporter :- अतुल दिघाडे
या कारवाईत चंद्रपूर शहरातील “फ्रेंड्स बार”, “सिटी बार”, “दीपक बार” यांसारख्या प्रतिष्ठानांसह रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील “राहुल धाबा”, “टू-किचन हॉटेल”, “मेजबाण बिर्याणी”, “आयस्क्रीम पार्लर”, “इटनकर पानठेला” आणि “सपना टॉकीज जवळील पान ठेला” यांसारख्या प्रतिष्ठानांचा समावेश आहे. या प्रतिष्ठानांनी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवलेल्या सेवा आणि नियमांची पायमल्ली केली होती.
पोलिसांनी प्रतिष्ठानांच्या मालकांना स्पष्टपणे सूचना दिल्या की, ते नियमानुसार वेळेत प्रतिष्ठान बंद करावीत. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सण व उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा नियम उल्लंघन सहन केला जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्पष्ट केले.
यामुळे चंद्रपूर शहरातील अन्य प्रतिष्ठानधारकांनाही कडक संदेश दिला जात आहे, की नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. पोलिसांनी भविष्यातही या प्रकारच्या कारवायांना चालना देण्याचा इशारा दिला आहे.