डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दत्त नगर मित्र परिवार व वडगाव बौद्ध समाज मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग…
चंद्रपूर :- जगातील सर्वांत महान विचारवंत, संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रतीक, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दत्त नगर मित्र परिवार व वडगाव बौद्ध समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य व ऐतिहासिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
News reporter :- अतुल दिघाडे
ही मिरवणूक ही केवळ एक धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम न राहता, ती समता, बंधुता आणि न्याय या बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करणारी प्रेरणादायी चळवळ ठरली. या मिरवणुकीमध्ये चंद्रपूर शहरातील विविध वयोगटांतील नागरिक, विशेषतः युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मिरवणुकीची शोभा द्विगुणित केली.
मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ढोल, ताशा, डीजे, बॅनर, फलक, पारंपरिक वेशभूषा आणि बौद्ध धम्माच्या गजरांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान आणि श्रद्धा ही बाबासाहेबांविषयी असलेल्या निष्ठेचे स्पष्ट प्रतिबिंब होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय
सहभागी सर्व नागरिक, युवक-युवती, महिला भगिनी, व कार्यकर्त्यांना देत आयोजक अभिनव देशपांडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. “ही केवळ एक सुरुवात आहे, बाबासाहेबांचे विचार आणि धम्म चळवळीचे तेज प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य आम्ही आपल्या सहकार्याने अधिक जोमात करणार आहोत. सर्व भाविक, समाज बांधवांनी असेच पाठबळ द्यावे हीच अपेक्षा,” असे उद्गार त्यांनी व्यक्त केले.
या मिरवणुकीच्या माध्यमातून समाजात एकात्मता, जागरुकता व प्रेरणा निर्माण झाली असून, येत्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.