कचरा संकलन करणाऱ्या महिलांना नोकरीवरून कमी केल्याने वंचित महिला आघाडी आक्रमक;
चार महिन्यांपासून थकीत पगाराचीही जोरदार मागणी
चंद्रपूर :- महानगरातील महिलांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी – महानगर चंद्रपूरच्या वतीने उपायुक्त मंगेश खवले यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व वंचितच्या महानगर अध्यक्षा तनुजा रायपुरे यांनी केले.
News reporter :- अतुल दिघाडे
निवेदनामध्ये शहरातील महिलांसाठी सुलभ शौचालयांची कमतरता, सीबीएसई शाळा सुरू करण्याची तातडीची गरज, प्रभागातील स्वच्छता व्यवस्था सुधारणा, तसेच नाली व गटारांच्या कामांची सद्यस्थिती यासारखे महिलांसह सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.
या विषयांवर यापूर्वीही महानगरपालिकेकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने वंचित महिला आघाडीने पुन्हा एकदा प्रशासनासमोर हक्काचा आवाज बुलंद केला.
कचरा संकलन करणाऱ्या महिलांवर अन्याय – वेतनही थकीत
महानगरपालिकेच्या कचरा संकलन विभागात कार्यरत असलेल्या अनेक महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. या महिलांचे मागील चार महिन्यांचे वेतनही अद्याप थकित आहे. या अन्यायाविरोधात वंचित महिला आघाडीने ठाम भूमिका घेत, त्या महिलांना पुन्हा कामावर घेण्याची व त्यांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्याची जोरदार मागणी केली.
“जिथे महिलांवर अन्याय होईल, तिथे वंचित बहुजन महिला आघाडी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. अन्याय सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा तनुजा रायपुरे यांनी प्रशासनाला दिला.
आंदोलनाचा इशारा
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला सतत निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यापुढे जर महिलांच्या समस्या गंभीरतेने न सोडविल्या गेल्या, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
उपायुक्तांनी मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेत त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी वंचित महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.