2004 पासून कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा विभागातील कामगारांना मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळणार?
शुभम गेडाम यांच्या पुढाकारातून सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात सन 2004 पासून कार्यरत असलेल्या कामगारांनी अखेर आपल्या हक्कासाठी एकत्र येत सशक्त पावले उचलली आहेत. नागपूर रोडवरील दत्त नगर येथे वास्तव्यास असलेले पाणी पुरवठा कामगार नेता आणि त्यांचे सहकारी कामगार यांनी भारतीय जनता पक्षाचे आदिवासी महामंत्री श्री. शुभम गेडाम यांच्या पुढाकारातून एक सशक्त निवेदन मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार – महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री – यांच्याकडे सादर केले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
या निवेदनाद्वारे कामगारांनी मागणी केली आहे की, गेल्या 20 ते 21 वर्षांहून अधिक काळापासून ते शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अखंडपणे आणि निष्ठेने सांभाळत आहेत, तरीदेखील अद्याप त्यांना कोणतीही शासकीय मान्यता, स्थायीकिकरण, किंवा किमान वेतनाच्या सुविधाही मिळालेल्या नाहीत.
कामगारांचे म्हणणे आहे की, “2004 पासून आमचे काम सुरू असून आम्ही वर्षानुवर्षे मनपाच्या अंतर्गत विविध पदांवर जबाबदारीने काम करत आहोत. कोरोनासारख्या संकटाच्या काळात देखील, जीव धोक्यात घालून आम्ही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. मात्र आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे.”
श्री. शुभम गेडाम यांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेतले असून, यासंदर्भात सकारात्मक विचार करत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी या विषयावर पुढील योग्य तो पर्याय निवडून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी मार्गदर्शन केल्याचे समजते.
कामगारांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, मनपातील इतर विभागांतील कामगारांना 2006 पासून स्थायीकृत करण्यात आले आहे, पण पाणीपुरवठा विभागाकडे मात्र आजवर दुर्लक्षच झाले आहे. कामगारांनी सवलती, वेतन पावत्या, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे, ही शासकीय अन्यायाची नमूद करणारी बाब आहे.
श्री. शुभम गेडाम यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, मा. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात या कामगारांसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे आश्वासन दिले की, “कामगारांचे स्थायीकिकरण योग्य पर्याय निवडून लवकरच करण्यात येईल,” असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले,
या पार्श्वभूमीवर, आता सर्वांचे लक्ष महानगरपालिकेच्या निर्णयाकडे लागले आहे. अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या या कामगारांना न्याय मिळणार का? शुभम गेडाम यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या लढ्याला यश मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
“कामगार हे आपल्या शहराच्या जलवाहिन्यांचे खरे रक्षक आहेत. त्यांना न्याय मिळवावा हीच काळाची गरज आहे,” असे मत अनेक सामाजिक संघटनांनी यासंदर्भात व्यक्त केले आहे.