Home Breaking News काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला! चंद्रपूर CDCC बँकेवर भाजपचा झेंडा फडकल्यावर राजकीय भूकंप

काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला! चंद्रपूर CDCC बँकेवर भाजपचा झेंडा फडकल्यावर राजकीय भूकंप

काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला! चंद्रपूर CDCC बँकेवर भाजपचा झेंडा फडकल्यावर राजकीय भूकंप

चंद्रपूर (22 जुलै) :-  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसचा दणदणीत पराभव करत भाजपने प्रथमच सत्ता मिळवली असून, अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची निर्विरोध निवड झाली आहे. हे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे खास राजकीय गिफ्ट ठरल्याचे वक्तव्य आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी यावेळी केलं.

News reporter :- अतुल दिघाडे

या निवडणुकीसाठी एकूण २१ संचालक निवडून आले होते. सुरुवातीपासूनच काँग्रेस व भाजप प्रणित गटांनी बहुमत असल्याचा दावा केला होता. मात्र, नाट्यमय घडामोडींमध्ये काँग्रेसचेच जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश करत काँग्रेसच्या गणितावर पाणी फेरले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सत्तेचा दोर काँग्रेसच्या हातातून निसटला, आणि त्यांनी अध्यक्षपदही हस्तगत केलं.

भाजपसाठी ही मोठी यशोगाथा ठरली असून, अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या अखत्यारीत असलेली ही बँक आज प्रथमच भाजपच्या हातात गेली आहे. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर देखील संचालक म्हणून निवडून आल्या होत्या, परंतु सत्ता राखण्यात काँग्रेसला अपयश आलं.

कार्यक्रमात उपस्थित —

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करन देवतळे. मात्र आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे हे उपस्थित नव्हते, यावरून भाजपा गोटातही काही चर्चा रंगली.

भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक

गेल्या काही महिन्यांत बँकेतील भरती प्रक्रियेत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या प्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आवाज उठवत SIT चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीची घोषणा करत प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसले.

भाजपा ‘किंगमेकर’ कोण?

या संपूर्ण राजकीय खेळीमधील खरे किंगमेकर आमदार भांगडिया आणि आमदार जोरगेवार ठरले, असे म्हटले जात आहे. त्यांनी शह-काटशहाची रणनीती आखत काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला ढासळवला.

भाजपने केवळ एक बँक जिंकलेली नाही, तर एक परंपरा मोडीत काढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये हा विजय भाजपसाठी नवा अध्याय ठरेल, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here