Home Breaking News भरधाव वेग, उत्साही युवा आणि बेफिकीरपणा — वाढते अपघाताचे चिंताजनक वास्तव!

भरधाव वेग, उत्साही युवा आणि बेफिकीरपणा — वाढते अपघाताचे चिंताजनक वास्तव!

भरधाव वेग, उत्साही युवा आणि बेफिकीरपणा — वाढते अपघाताचे चिंताजनक वास्तव!


वरोरा नाका चौकात महागड्या बाईकचा थरारक अपघात, युवक गंभीर जखमी

चंद्रपूर | 22 ऑगस्ट :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नाका चौकात आज पुन्हा एकदा वेग, थरार आणि बेफिकीरपणाचा परिणाम दिसून आला. भरधाव वेगात असलेल्या एका महागड्या बाईकस्वाराने टर्निंग घेणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाईकस्वार युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना विश्रामगृहासमोर दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

News reporter :- अतुल दिघाडे

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बाईकस्वार युवक अतिशय वेगात चालवत होता. त्याचा वेग इतका प्रचंड होता की समोरील वळणावर वळण घेत असलेल्या कारचा अंदाज न लागल्यामुळे त्याने कारला जबरदस्त धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील लोक घटनास्थळी धावत आले. या धडकेत बाईकस्वार जवळपास 15-20 फूट हवेत फेकला गेला आणि दूर जाऊन कोसळला. अपघातात बाईक आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात जखमी युवकाला तात्काळ स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले पुढील उपचार सुरू आहे.

वाढती वाहतूक, उत्साही तरुणाई आणि पालकांचा अति लाड – या सर्वांचा दुष्परिणाम?

सध्याच्या काळात अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये बाईक चालवताना वेग आणि थराराचा अतिरेक दिसून येतो. महागड्या बाईक घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. अनेक वेळा कॉलेजमध्ये जाणारे किंवा कोचिंग क्लासेससाठी बाहेर पडणारे तरुण पालकांच्या खर्चावर महागड्या गाड्या घेतात. पालकही मुलांच्या हट्टापोटी त्यांना हे सर्व देतात. मात्र त्याचा परिणाम रस्त्यावर जीवघेण्या अपघातात होतो.

पोलीस प्रशासनाची भूमिका आणि आवश्यक उपाययोजना

चंद्रपूर शहरात आणि त्याच्या उपनगरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वरोरा नाका चौक, उडान पुल, विश्रामगृह परिसर हे अपघातांचे हॉटस्पॉट ठरत आहेत. याठिकाणी ट्रॅफिक पोलीसांची उपस्थिती, सीसीटीव्ही नियंत्रण, वेगमर्यादा दर्शविणाऱ्या पाट्यांचे पालन आणि युवकांवर योग्य नियंत्रण याची गरज आता अत्यंत तीव्रतेने जाणवत आहे.

पालकांनी घ्यावी जबाबदारी

आजची युवा पिढी अत्याधुनिक बाईक, फॅशन आणि वेगाच्या मागे धावताना स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याशी खेळ करत आहे. पालकांनी केवळ मुलांच्या हौशीसाठी महागड्या गाड्या न देता, त्यांना जबाबदारीची आणि सुरक्षिततेची जाणीव करून देणे गरजेचे आहे. गाडी चालवताना हेल्मेट, सीट बेल्ट आणि ट्रॅफिक नियमांचे पालन हे अत्यंत आवश्यक आहे.


ही दुर्घटना हे केवळ एक उदाहरण नाही, तर सध्याच्या समाजातील बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. अशा अपघातांपासून सबक घेऊन प्रशासन, पालक आणि युवा पिढीने वेळेत जागरूक होणे हीच काळाची गरज आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटनांची मालिका थांबणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here