मुंबई: पोलिस भरतीत सुधारणा, वयोमर्यादेचा एक वेळा विशेष सवलत निर्णय
लाखो तरुणांना दिलासा, २०२५ पर्यंतच्या उमेदवारांना संधी
मुंबई, ११ सप्टेंबर २०२५ :- महाराष्ट्र सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे, ज्यामुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिस हवालदार ते तुरुंग हवालदार पदांसाठी १५,६३१ रिक्त पदांची भरती केली जाणार असून, २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार आता एक वेळा विशेष सवलतीसह अर्ज करू शकतात.
News reporter :- अतुल दिघाडे
हा निर्णय वयामुळे मागे राहिलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी ठरली आहे. विभागाचे उपसचिव रवींद्र पाटील यांनी १० सप्टेंबर रोजी शुद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. याआधी २०२२-२३ वर्षातील उमेदवारांसाठीच सूट होती, पण आता त्याला २०२५ पर्यंत वाढविण्यात आले आहे. हे पाऊल पोलिस दलाला आणखी सक्षम करण्यासाठी आणि विविध वयोमानाने उमेदवारांना संधी देण्यासाठी उचलण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होईल आणि उमेदवारांना लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी पास करावी लागेल. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल www.mahapolice.gov.in वर तपशील उपलब्ध आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे बेरोजगारीच्या संकटाशी झुंजत असलेल्या तरुणांना नवा उत्साह मिळेल, परंतु शारीरिक निकषांमध्ये कोणतीही शिथिलता नाही, त्यामुळे तयारी अत्यंत गंभीर असावी लागेल.
या निर्णयामुळे पोलिस दलाला अनुभवाने संपन्न उमेदवार मिळणार असून, महाराष्ट्र पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.