Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-मनपाच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भोजन वाटपातून चमकोगिरी ?

ब्रेकिंग न्यूज :-मनपाच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भोजन वाटपातून चमकोगिरी ?

नगरसेवक पप्पू देशमुख यांची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रार ! कारवाईची मागणी ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

देशात एकीकडे कोरोना संक्रमणाच्या भितीपोटी संचारबंदी लावल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर दुसरीकडे अशा गरजू लोकांना भोजन वाटप करण्याचा समाजपयोगी उपक्रमात देखील सत्ताधारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या फंडातून भोजन वाटपात चमकोगिरी करीत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे, चंद्रपूर मनपा कडून मागील पंधरा दिवसांपासून भोजन वाटप राबविण्यात येत आहे. यासाठी प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून गरजू लोकांना भोजनाचे डबे पोहोचविण्यात येतात. प्रथम मनपाच्या तीनही झोनमध्ये डब्याचे समान वाटप करण्यात करण्यात आले होते. त्यानंतर प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून हे डबे गरजू पर्यंत पोहोचण्यात येत होते. सुरुवातीला महानगरातील काही स्वयंसेवी संस्थांनी मनपाला डबे पुरवले. परंतु मनपाचे पदाधिकारी स्वतःच्या पक्षाचे लेबल लावून डब्बे वाटप करीत असल्याची बाब स्वयंसेवी संस्थेच्या लक्षात आल्याने त्यांनी डब्बे देणे बंद केले अशी चर्चा आहे.सुरुवातीला स्वयंसेवी संस्थेतर्फे देण्यात येणार्‍या डब्यातून प्रत्येक नगरसेवकाला दिवसातून एकदा 40 ते 50 डबे देण्यात येत होते.त्यानंतर मनपाने एक निविदा प्रक्रिया तातडीने राबवून दररोज दोन वेळ 50 डब्बे व मागील तीन दिवसापासून सत्तर ते शंभर डब्बे प्रत्येक नगरसेवकाला देणे सुरू केले.या निविदा प्रक्रियेबाबत सुद्धा मौखिक तक्रारी अनेक नगरसेवकांनी प्रशासनाकडे केलेल्या होत्या. मात्र डब्ब्यांची संख्या गरजू लोकांपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे अनेक नगरसेवकांनी भोजनाचे डबे वाढवून देण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली.भोजनाच्या डब्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे यापेक्षा जास्त डबे देता येणार नाही असे कारण प्रशासनातर्फे नगरसेवकांना सांगण्यात येत होते. परंतु याबाबत वडगाव प्रभागाचे नगरसेवक जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना एक गुप्त माहिती मिळाली की मनपाच्या निधीतून तयार होत असलेले हजारो भोजनाचे डबे परस्पर सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी उचलत असून त्याचे वाटप ते जिल्ह्यातील एका प्रभावशाली नेत्याच्या व पक्षाच्या नावाखाली करीत आहे. त्यामुळे दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अचानक आकाशवाणी जवळील वडगाव रोडवरील भोजनाचे कंत्राट मिळालेल्या एका कंत्राटदाराच्या घरी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी धडक दिली.त्यावेळी त्यांनी तिथे असलेल्या एका पक्षाच्या काही चार चाकी वाहनांची व त्यामध्ये टाकण्यात आलेल्या भोजनाच्या डब्याची शूटिंग करून सदर कंत्राटदाराला जाब विचारला असता कंत्राटदाराने संशयास्पद उत्तरे दिली. यावरून पक्षाच्या नावाखाली केवळ राजकीय हेतूने सर्रासपणे भोजन वाटप करण्यासाठी डबे नेण्यात येत आहेत व याचा खर्च मनपाचे निधीतून करण्यात येणार असल्याचे सिद्ध झाले.या सर्व गैरप्रकराची तक्रार देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मनपा आयुक्त मोहिते यांचेकडे केली.संपूर्ण गैरप्रकाराची चौकशी करून मनपाच्या निधीचा राजकीय फायद्यासाठी दुरूपयोग करणाऱ्या पदाधिकारी यांचेविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here