दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी संकटात !
चंद्रपूर प्रतिनिधी :–
कोविड १९ या संसर्गजन्य रोगामुळे सर्वत्र संचार बंदी लागू झाल्याने अनेक शेतकरी कष्टकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ओला दुष्काळ व त्यानंतर कोरूना मुळे शेतमालाची उशीरा सुरू झालेली खरेदी तसेच बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीची वेळ आल्याने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सरकार कडून मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज चंद्रपूर येथील हिराई विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात कृषिमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले.
सदर निवेदनात नविन कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यात यावे तसेच ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीजजोडणी नाही अशा शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज जोडणी देऊन अनुदानित कृषी पंप देण्यात यावे, तसेच रखडलेल्या पांदन रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेत रोजगार उपलब्ध नसल्याने टेंडर करून कंत्राटी पद्धतीने ती कामे करून पांदन रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच बोगस बियाण्यांच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी बोगस कंपन्यांवर कारवाई करून दुबार पेरणी करता लागणारा संपूर्ण खर्च व नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित कंपनीला द्यावे व मागील वर्षी ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला होता व बाधित शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या तरतुदी नुसार पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नसून तो त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा अशा आशयाचे विविध मागण्या घेऊन निवेदन कृषी मंत्र्यांना देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांना मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनवीसे शहराध्यक्ष नितीन पेंदाम, शहर उपाध्यक्ष राकेश बोरीकर, तालुका उपाध्यक्ष करण नायर, अक्षय चौधरी, नितीन टेकाम आदी उपस्थित होते.