Home चंद्रपूर लक्षवेधी :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी खरंच हटणार की केवळ फार्स ठरणार ?

लक्षवेधी :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी खरंच हटणार की केवळ फार्स ठरणार ?

 

लक्षवेधी :-

खरं तर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तीच मुळात चुकीची आणि कुठलेही ठोस कारण नसलेली अशी ठरली, आज चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे असे कोण म्हणतो ? हा प्रश्न केल्यास कुणीही अडाणी व्यक्ती सुद्धा सांगेल की दारूबंदी झाली ती कुठं? दारू तर सगळीकडेच मिळते, जिल्ह्यात दारूबंदी झाली ती केवळ अधिकृत परवानेधारक यांच्यासाठीच, मात्र पोलीस प्रशासन आणि काही राजकीय पुढारी यांचे हस्तक यांच्या अर्थकारणाने जिल्ह्यात दारू विक्रीचे जाळे सगळीकडे विस्तारुन जणू दारू विक्रीचे अधिकृत परवाने मिळाल्यागत दारू सगळीकडे सुरू आहे. अशातच काही अवैध दारू विक्रेते हे चोरी छुपे दारू आणतात नव्हे त्यांना अवैध दारू विक्री करण्याचा पोलिसांकडून परवाना मिळाला नाही अशाचीच दारू पकडली जाते, म्हणजे दारूबंदी च्या नावावर काही मोजक्या लोकांना दारू विक्री करण्याची मुभा देवून तो पैसा राजकीय ताकत वाढविण्यासाठी वापरला जात आहे आणि सर्वसामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा किमतीत दारू विकत घ्यावी लागतेय ज्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या दारूबंदी समीक्षा समितीच्या अहवालात चंद्रपुरात दारूबंदीनंतर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचे व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बंदीच्या आधी जिल्ह्य़ात २४ बालगुन्हेगार होते. आता त्यांची संख्या ३०२ झाली आहे. यांतले बहुसंख्य दारूतस्करी करतात. बंदी नसताना दारूविक्रीच्या व्यवसायात १,७२९ महिला होत्या. आता त्यांची संख्या ४,०३२ झाली आहे. आधी १४,३५१ पुरुष अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात होते. आता हा आकडा ४१ हजारांवर पोहोचला आहे. बंदी नसतानाच्या काळात या जिल्ह्य़ात वर्षांकाठी सर्व प्रकारच्या ३७ हजार गुन्ह्य़ांची नोंद व्हायची. आता हा आकडा ८३ हजारांवर गेला आहे. या बंदीमुळे व्यापार जगतावर मोठा परिणाम झाला असून अनेक लहान उद्योग बंद पडले, तर मोठे उद्योग डबघाईला आले आहेत.’ तर दुसरीकडे ज्यांची एकावेळेची जेवण्याची सोय नव्हती घरचे छप्पर नव्हते ते आज दारूच्या अवैध व्यवसायातून लखोपती झाले, ते कारने फिरायला लागले आणि बंगले बांधून श्रीमंतांच्या यादीत सामील झाले. म्हणजे दारूबंदी ही अवैध व्यावसायिकांना वरदान ठरली तर सर्वसामान्यांना ती मारक ठरली असेच म्हणावे लागेल.

आता ही दारूबंदी उठविण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतल्यानंतर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील तथाकथित समाजसेवक व सामाजिक संघटनांनी रान पेटवले की दारूबंदी उठवू नये, पण मला हे कळत नाही की ज्याअर्थी दारू सगळीकडे मिळत असताना दारूबंदी झालीच कुठे ? फक्त अधिकृत परवाने धारकांकडून होणारी दारू विक्री ही अनाधिकृत परवाने धारकांकडून होत आहे आणि कमी किमतीत मिळणारी दारू ही अव्वाच्या सव्वा किमतीत विकत घ्यावी लागत आहे. पण महत्वाची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात येणारी दारू ही मोठ्या प्रमाणात गावठी पद्धतीने रासायनिकयुक्त व विषारी येत आहे, त्यामुळे हजारो लोकांना यापासून लिव्हरचा त्रास व इतर आजार होऊन अनेकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे असली ही दारूबंदी काय कामाची ? ज्या सामजिक संस्थांना व्यसनमुक्ती करिता शासनाकडून पैसा मिळतो त्या सामाजिक संस्थांच्या लोकांनी दारूचे व्यसन असणाऱ्या किती लोकांना व्यसनमुक्त केले ? याचा आकडा आजपर्यंत त्यांनी जाहीर केलेला नाही, अर्थात फक्त दारूबंदी च्या नावावर आपलं अर्थकारण अबाधित राखण्यासाठी काही लोक प्रायोजक बनून दारूबंदी उठवू नये म्हणून वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे, एका शाळेकरी मुलीद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जिल्ह्यात दारूबंदी उठवू नये म्हणून मागणी  करणारे नेमके कोण ? याचाही शोध आणि बोध घेणे महत्वाचे असून चंद्रपूर जिल्ह्यात फसलेली दारूबंदी ही उठविण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना ताकत देणे महत्वाचे आहे. दारूबंदी उठविण्यात यावी यासाठी लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण नेले पण जर राज्य सरकार दारूबंदी उठविण्याच्या तयारीत असेल तर निश्चितपणे सर्वोच्य न्यायालयाचा निकाल लिकर असोसिएशन अर्थात दारूबंदी उठविण्यासाठीच्या बाजूने लागू शकतो पण या सर्व भानगडीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटणार की केवळ फार्स ठरणार ? याबाबत मात्र शंका कुशंकेला वाव मिळत आहे.

Previous articleशाळेच्या फी संदर्भात आधी हात जोडून तरीही सरकारने नाय ऐकलं तर हाथ सोडून” – राजसाहेबांचं पालकांना आश्वासन!
Next articleब्रेकिंग न्यूज :- तब्बल 12 तासांनंतर अपहरण झालेला वीर सापडला नागपूरला, सोशल मीडियाची महत्वाची भूमिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here