दैवी चमत्कार की डॉक्टरांचा हलगर्जीपणा?याविषयी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ,
चंद्रपूर प्रतिनिधी :-
कोरोना महामारीच्या काळात एकीकडे जनता भयभीत असताना दुसरीकडे डॉक्टर संधीचा फायदा घेत रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट करीत असल्याने सर्वत्र आरोग्य विभागाविरोधात संतापाची लाट आहे अशातच बल्लारपुरातील गणपती वार्डात राहणाऱ्या भारती मराठे (३८) यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात चक्क मृत घोषित केल्यानंतर बल्लारपूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर तब्बल दीड तासानंतर त्या जिवंत असल्याची बाब उघड झाल्याने डॉक्टरांच्या निर्णयाविरुद्ध परिवाराकडून संताप व्यक्त होत आहे,
भारती मराठे (३८) यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना शनिवारी चंद्रपूरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचाराअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले व नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली त्यामुळे त्यांच्या राहत्या घरी अंतीम संस्काराची तयारीही सुरू झाली, मात्र देव तारी त्याला कोण मारी ? या वाक्याची प्रचिती येत डॉक्टरांचा मृत घोषित करण्याचा निर्णय चुकला, एका नातेवाईकाला शनिवारी रात्रो मृत घोषित केलेल्या महिलेच्या शरीरामध्ये हालचाल होतांना दिसल्यामुळे खळबळ माजली. त्यानंतर त्या महिलेला उपचारार्थ रविवारी नागपूर येथे हलविण्यात आले. आता त्या महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे सांगीतल्या जाते. या घटनेने मराठे कुटुंबियांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. भारती मराठे या पोस्टाच्या एजेंट आहेत. नेहमीप्रमाणे त्या आरडीचे पैसे गोळा करायला निघाल्या. मात्र अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर हा प्रसंग उद्भवला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या संतापजनक घटना आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगनाऱ्या आहे. मात्र घडलेल्या या घटनेमुळे त्या डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.