सक्षम नेतृत्व दिल्यास शिवसेनेला येणार चांगले दिवस, राजकीय विश्लेषकांचे मत.
चंद्रपुर प्रतिनिधी –:-
राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा शिवसेना हा प्रमुख पक्ष असून राज्याचा मुख्यमंत्री देखील शिवसेनेचेचाच आहे. परंतु चंद्रपुर जिल्ह्याने शिवसेनेला सत्ताकाळात चांगले दिवस यायची चांगली संधी असताना पक्षश्रेष्ठीनी जिल्ह्यात दमदार तुल्यबळ व्यक्तींना जिल्ह्याची प्रमुख धुरा दिली नसल्याने नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला हवे ते यश मिळवता आले नाही ही वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे तत्कालीन आमदार असलेले आता विदयमान पालकमंत्री व खासदार आहेत. ते सेनेतून मोठे झाले व आज राज्यात कांग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी आहेत. हे नेते जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा सेनेला चांगले दिवस होते. मात्र हे नेते पक्षातून जाताच आज जिल्ह्यात शिवसेना अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. म्हणजे सेनेचे जिल्ह्यातील सक्षम नेतृत्वच इतर पक्षाच्या नेत्यांच्या तुल्यबळ नसेल तर पक्षाची राजकीय पडझड होणारच.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर हे जेव्हापासुन कांग्रेसवासी झाले तेव्हापासून शिवसेनेची या जिल्ह्यातील वाटचाल बघता, पक्षाला जिल्ह्यात उतरती कळा लागलेली दिसून येते. किंबहुना स्थानिक नेत्रूत्व औद्योगिक आणि इतर अवैध धंद्यात गुंतले की काय असेच चित्र आहे. मात्र प्रत्यक्षात जनतेची कामे, स्थानिक समस्या, वन्यजिव व मानव संघर्ष, प्रदूषण, शासकीय योजनांची अंमलबजावणी, पक्ष संघटन, कार्यकर्त्यांशी संवाद, निवडणुकांमधील सक्रीय भुमिका, आदी पाय-यांवर पक्षनेतृत्व अपयशी होत असल्याच चिन्ह आहे.
मागील काही वर्षात जिल्ह्यात सेनेच्या पक्षनेतृत्वाला आपले स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतीनीधी सांभाळता आले नाही. जिल्ह्यातील विशेषत: वरोरा-भद्रावती तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आदींनी पक्ष सोडून कांग्रेसमधे वेगळी चुल मांडली. भद्रावतीतील अनेक नगरसेवक व पदाधिकारी सेनेतून निवडून येवूनही कांग्रेसला प्रामाणिक असल्यागत वागतात. सेनेचे असुन कांग्रेसच्या फलकांवर दिसतात. मोठ्या निवडणुकीत कांग्रेसचा प्रचार करतात. नेमक कोण सेनेत व कोण कांग्रेसमधे हेच वरोरा विधानसभा क्षेत्रात कळत नाही. ब्रम्हपुरी तालुक्यातील तालुका संघटीका, उपजिल्हा संघटीका, यांनीही कांग्रेसमधे प्रवेश केला. राजुरा तालुक्यातील तालुकाप्रमुखाने पदाचा राजीनामा दिला. गडचांदुर येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुखाने पक्षाच्या पदासहित गडचांदूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाचासुद्धा राजीनामा दिला. चंद्रपुरमधे शिवसेना महिला जिल्हाप्रमुखानी भाजप प्रवेश घेतला. संपर्क प्रमुखांनी नियुक्त केलेला उपजिल्हा प्रमुख पक्ष सोडू कांग्रेस मधे गेला. वरो-यातील जिल्हाप्रमुखाला जुगार प्रकरणात पदावरुन काढण्यात आले. जिल्ह्यातील अशा अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधींनी पक्षातील नेतृत्वाला कंटाळून व अंतर्गत कलहाला त्रासून राजीनामे दिले. पक्ष सत्तेत असुन देखील कामे होत नसल्याची ओरड आहे.
आताच जिल्ह्यात पार पडलेल्या सहा नगरपंचायतींच्या निवडणुक प्रक्रियेत कोरपणा नगरपंचायतीत शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही. व उर्वरीत पाच नगरपंचायतींपैकी सावली, सिंदेवाही व जिवती नगरपंचायतीमधे शिवसेनेला खाते उघडता आले नाही. गोंडपिपरीत नव्याने सेनेत पक्षप्रवेश केलेल्या संदीप करपे व नविन टीम मुळे दोन जागेवर विजय मिळविता आला. तर पोम्बुर्णा नगरपंचायत ही नेहमीच भाजप व सेना अशी संधीग्ध मिलिभगत राहीली आहे, परीणामी चार जागांवर सेनेला समाधात मानावे लागले. वास्तविक या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची दयनिय अवस्था राहीली आहे. हीच परीस्थिती भविष्यात चिमुर व वरोरा विधानसभा क्षेत्रात होणार आहे. चिमुर, वरोरा व ब्रम्हपुरी तालुक्यात कांग्रेस व भाजपाचे बलाढ्य लोकप्रतिनिधी आहेत, त्या तुलनेत शिवसेनेच नेतृत्व हे तुल्यबळ नाही. याचा फटका आगामी निवडणुकांवर नक्कीच होईल, असे जाणकारांचे मत आहे.
ही सर्व परीस्थिती पाहता जिल्ह्यात शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सत्ता नसताना अनेकजण शिवसेनेत प्रवेश करीत होते मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे पदाधिकारी पक्ष सोडतात, ही पक्षाची शोकांतीका आहे. राज्यात सत्तेत असताना पक्षाची जिल्ह्यात ही परीस्थिती असेल तर येथील पक्षनेतृत्वात बदल घडवून आणने क्रमप्राप्त होते. सोबतच वरीष्ठ पक्षनेतृत्वाने जिल्ह्यातील सेनेचा बुरुज ढासळण्याच्या कारणांचे विश्लेषण करुन कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्ह्यात पक्ष हा नावापुरताच राहील, असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.