Home चंद्रपूर ब्रेकिंग:- चंद्रपूर जिल्हा परिषदच्या पंचायत विभागात पद नियुक्ती घोटाळा ?

ब्रेकिंग:- चंद्रपूर जिल्हा परिषदच्या पंचायत विभागात पद नियुक्ती घोटाळा ?

पंचायत विभागाचे बावनकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोटाळ्यात अडकणार ?

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या नांवावर भ्रष्टाचाराचे कुरण बनले की काय? असा गंभीर प्रश्न उभा ठाकला असून नुकत्याच वरोरा पंचायत समिती मधील कॉम्पुटर ऑपरेटर पदाची बेकायदेशीर नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने आता या अगोदर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या संपूर्ण कंत्राटी नौकर भरती चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वाढली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरोरा पंचायत समितीच्या पंचायत विभागात कॉम्पुटर ऑपरेटर पदाची जागा असल्याने संवर्ग विकास अधिकारी राठोड यांनी जिल्हा परिषद पंचायत विभागाला या जागेची भरती घ्यावी अशी विनंती केली होती. दरम्यान दोन ते तीन ऑपरेटर यांच्या नावाची शिफारस संवर्ग विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे केली परंतु कुणाचीही नियुक्ती पंचायत विभागाने केली नाही. अशातच सुमित फुलझेले या पदवी धारक व कॉम्पुटर ऑपरेटर असलेल्या युवकाने अर्ज करून व संवर्ग विकास अधिकारी राठोड यांचा शिफारस पत्र जोडून जिल्हा परिषद पंचायत विभागाचे बावनकर यांच्याकडे संपूर्ण दस्तावेज दिले. त्यावेळी आपणांस दोन ते तीन दिवसात नियुक्ती पत्र येणार असे पण सांगण्यात आले परंतु त्यांनी बावनकर यांना पैसे दिले नसल्याने व त्या संबंधी कुठलीही पैसे देण्यासंदर्भात बोलणी झाली नसल्याने बावनकर यांना पैसे देणाऱ्या काकडे या एकार्जुना येथील कॉम्पुटर ऑपरेटर यांची त्वरित नियुक्ती देऊन सुमित फुलझेले यांचा अर्ज खारिज केला.

काकडे यांची नियुक्ती बेकायदेशीर ?

जिल्हा परिषदच्या जाहिरात मधे पंचायत समिती मधील कॉम्पुटर ऑपरेटर या पदासाठी पदवीधर असणे बंधनकारक असताना बावनकर यांनी पैसे घेऊन पदवीधर नसलेल्या काकडे यांची नियुक्ती केली असल्याने या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कलोडे यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधला मात्र त्यांनी उत्तर दिले नसल्याने पंचायत विभागात कंत्राटी नौकर भरती मधे मोठा भ्रष्टाचार सुरू आहे हे लक्षात येत असल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या कडून मुख्य कार्यकारी अधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या आजवर झालेल्या संपूर्ण नौकर भरतीची चौकशी करण्याची व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पंचायत विभागाचे बावनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी या नौकर भरती घोटाळ्यात अडकणार असल्याने आता या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत विभागात काय खलबते सुरू होणार कुणाची वाट लागणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here