Home Breaking News भाजपचा कार्यकर्ता ‘सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी’ काम करणारा – ना.सुधीर मुनगंटीवार

भाजपचा कार्यकर्ता ‘सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी’ काम करणारा – ना.सुधीर मुनगंटीवार

ना. मुनगंटीवार यांनी भाजपा महिला मोर्चाच्या बैठकीत साधला संवाद

*चंद्रपूर, दि.१८- एकीकडे विरोधी पक्ष केवळ सत्तेच्या हव्यासापोठी समाजात जातीभेदाचे वीष पसरवित आहेत. आणि दुसरीकडे देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वात भाजपा जनसेवेच्या भूमिकेतून काम करीत आहे. कारण भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी काम करतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (बुधवार) केले.*

भाजपा महिला मोर्चाच्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नेत्या वनिताताई कानडे, प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम, स्वाती देवाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदनाताई शेंडे, महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, लक्ष्मीताई सागर, प्रियाताई लांबट, पोंभूर्णा नगराध्यक्ष सुलभा पिपरे, वंदना आगरकोठे, अॅड. अरुणा जांभुळकर, रंजना मडावी, सुरेखा श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र सरकार येत्या रक्षाबंधनाला बहिणींच्या खात्यात १५०० रुपये देणार आहे. त्यापूर्वी सरकारच्या योजना गावागावांत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. महिलांचे कुशल संघटन, त्यांचे प्रयत्न, लोकांशी संवाद आवश्यक आहे. हे सारे सत्तेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी करायचे आहे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. बचत गटांसाठी, मुलींसाठी, महिला उद्योजकांसाठी असलेल्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवा. असे काम करा की ‘एकच चर्चा चंद्रपूरचा महिला मोर्चा’ असा नारा संपूर्ण महाराष्ट्रात लागला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर विरोधक टीका करीत आहेत. या योजनेच्या विरोधात लोक न्यायालयात जात आहेत. महिला कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन योजनेचे सत्य सांगायचे आहे. त्यासाठी प्रवास करावा लागेल. संघटना मजबुत करण्यासाठी प्रवास आणि संवाद अत्यंत आवश्यक आहे. कारण कुठलेही युद्ध विचारांच्या शक्तीने जिंकता येते. अफजलखानाकडे हत्ती, घोडे, शस्त्र भरमसाट होते. पण विचारांची सुसूत्रता छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. त्यामुळे महाराजांचा विजय झाला. आपल्यालाही शस्त्राने नव्हे विचारांच्या सुसूत्रतेने ही लढाई जिंकायची आहे,’ असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

*म्हणून संघटना बांधा!*
निवडणुका आहेत म्हणून नव्हे तर समाजाला काही देणे लागतो म्हणून संघटन मजबुत करा. महिलांनी गावागावांत संघटना बांधली पाहिजे. खुर्चीसाठी नव्हे तर राष्ट्रहितासाठी कार्य करायचे आहे. प्रत्येक बैठकीत गावातील सर्व महिला कार्यकर्त्यांना एकत्र आणा आणि नवीन लोकही जोडा, असेही आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here