जनता महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय उत्कर्ष शिबिरात सहभाग
चंद्रपूर :- विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे. यावर्षी रासेयो अंतर्गत राज्यस्तरीय उत्कर्ष शिबिराचे आयोजन २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संघात जनता महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेविका कु. आर्थिका संजय उपाध्येची निवड झाल्यामुळे महाविद्यालयात आनंदाची लहर पसरली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
आर्थिका उपाध्येचा राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. तिच्या कष्टाने आणि अथक प्रयत्नांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कार्यक्रमांत आपला ठसा उमठवला आहे. यावर्षीच्या राज्यस्तरीय गणतंत्र परेडमध्ये तिची निवड करण्यात आली होती, तसेच यापूर्वी ती इंद्रधनुष या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत देखील निवडली गेली होती. तिच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडाशक्तीने संपूर्ण महाविद्यालयाचा मान उंचावला आहे.
राज्यस्तरीय उत्कर्ष शिबिरात आर्थिकाच्या सहभागामुळे तिच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या यशासाठी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकभाऊ जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बलकी व प्रा. गणेश येरगुडे यांच्यासह तिच्या मार्गदर्शक शिक्षकांनी तिचे विशेष कौतुक केले. तसेच, तिच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, आर्थिकाच्या यशामध्ये तिच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. तिच्या आई सौ. अनुराधा आणि वडील श्री. संजय रामचंद्र उपाध्ये यांच्या वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाने तिच्या यशाला गती दिली आहे. आर्थिका नेहमीच आपल्या प्रयत्नांमध्ये उत्तम कार्य करण्याचा दृढनिश्चय ठेवते, जो इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायक आदर्श ठरतो.
महाविद्यालयाच्या वतीने आर्थिकाचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातील आणखी मोठ्या यशाच्या दिशेने तिचा मार्गदर्शन केला गेला आहे. तिचे यश फक्त तिला आणि तिच्या कुटुंबालाच नव्हे, तर महाविद्यालय आणि समाजालाही गौरव मिळवून देणारे आहे.
उत्कर्ष शिबिरातील तिचा सहभाग हा एक मोठा टप्पा आहे, आणि यापुढेही ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले नाव उज्ज्वल करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.