मृत्युशी झुंज सुरू, पतीचाही सहभाग असल्याने तिघांवरही गुन्हे दाखल करून पोलीसांनी केली अटक.
न्यूज नेटवर्क :-
कुटुंब कलहातून कुणाचा कधी काय गेम होईल याचा नेम नसल्याच्या अनेक घटना नेहमी बघावयाला मिळतात अशीच एक घटना गडचिरोली मधे घडली असून एका विवाहित महिलेला तिच्या सासू आणि नंदनने जिवंत पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार पोर्ला येथे घडला असून त्यात पतीनेही सहकार्य केल्याने त्या तिघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
चंद्रकला मुकेश बांबोळे (वय ३३) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, मूळच्या गडचिरोली जिल्ह्यातील असलेल्या चंद्रकला हिचा विवाह जळगाव जिल्ह्यातील नसिराबाद येथील अरुण पाटील यांच्याशी २०११ मध्ये झाला होता, पण त्यांच्यात पटत नसल्यामुळे घटस्फोट होऊन चंद्रकला माहेरी राहायला आली. तिला पहिल्या पतीपासून १० वर्षाची मुलगीही आहे.
दरम्यान, अगरबत्ती प्रकल्पात काम करताना मुकेश बांबोळे याच्याशी तिचे सूत जुळले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. चंद्रकलाच्या मुलीलाही मुकेशने स्वीकारले, पण त्याच्या आई व बहिणीला ते मान्य नव्हते. त्यावरून त्यांचे खटके उडत होते. अलीकडे मुकेशचेही तिच्याशी पटत नसल्यामुळे तिचा भ्रमनिरास झाला. यातूनच चंद्रकलाची सासू सरस्वती धर्माजी बांबोळे आणि नणंद ममता धर्माजी बांबोळे यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवले. पती मुकेश धर्माजी बांबोळे याने नंतर तिला दवाखान्यात आणले.
याप्रकरणी चंद्रकलाच्या जबाबावरून तिघांवरही भादंवि कलम ३०७, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास एपीआय गोरे करीत आहे.