शाळांमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर निर्बंध, पालकांची ऑनलाईन मीटिंग होणार,
न्यूज नेटवर्क :-
जगभरात आता नवीन कोरोना चा ट्रेंड समोर येत असताना राज्य सरकारने राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शाळांसांठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या वर्गात १५ ते २० विद्यार्थी एका वर्गात बसतील. एक बाकावर एकच विद्यार्थी बसेल, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरावी. एका वर्गात दोन बाकांमध्ये सहा फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे. असं सांगण्यात आलं आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं बोलवावं, एक बॅच पहिल्या दिवशी तर दुसरी बॅच दुसऱ्या दिवशी किंवा सकाळ दुपार सत्रामध्ये विभागणी करावी. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.
शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असेही सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या तर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अगोदर समिती गठीत आहे. या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी काही बाबींवर चर्चा करावी, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात किंवा गावात कोवडिचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक. शाळेत गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना परिसरात प्रवेश देऊ नये. कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अथवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवले जावे. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्यध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. शिवाय, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. शिवाय कोवडिग्रस्त विद्यार्थ्यांच्या शएजारील विद्यार्थ्यांची देखील करोना चाचणी करून घ्यावी. असंही नमूद आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना –
शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे.