आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे खळबळजनक विधान, कोरोनाचा पारा चढला.
मुंबई न्यूज नेटवर्क :-
राज्यात करोनाचा संसर्ग रुपी पारा चढायला लागल्याने राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे. तसंच खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आलं आहे. सरकारी कार्यालयांची दारं अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, चित्रपट आणि नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. तसंच उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निर्बंधांमध्ये धार्मिक स्थळं आणि दारुच्या दुकानांचा उल्लेख नसला तरी त्यासंबंधी त्यांनी मोठा इशारा दिला आहे. जालन्यात बोलताना त्यांनी गर्दी झाली तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असं सांगितलं असून धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे. “एकाच वेळी जास्त गर्दी करु नये. मंदिरं बंद केलेली नाहीत, पण सामाजिक अंतर पाळलं जावं,” असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.