Home महाराष्ट्र लक्षवेधी:- खरंच बच्चु कडू यांनी खोके घेतले नसतील का ? एक राजकीय...

लक्षवेधी:- खरंच बच्चु कडू यांनी खोके घेतले नसतील का ? एक राजकीय आढावा.

खोक्यावरून भांडू लागले बोकेत, तरीही मुख्यमंत्री कां म्हणतायत सब ओके?

लक्षवेधी :-

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी आमदारांची बदनामी करणारा “पन्नास खोके सर्व काही ओके” हा आता परवलीचा शब्द बनला आहे. खरंतर शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या गद्दारीची चर्चा इतकी तळागाळातील जनतेत रुजली आहे की, आत्ता तर लहान मुलंही “ते “आमदार दिसले की,हा बघ, खोकेवाला आला, असे एकमेकांना खुणावू लागतात. इतकंच नव्हे तर जेंव्हा हे आमदार लग्न वा तत्सम कार्यक्रमात जातात, तेंव्हा लोक कुजबुजत असतात- बघ तो गुवाहाटीचा खोकेवाला आला. मजेशीर व तेवढीच गंभीर अशी बाब म्हणजे आत्ताच सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात जेंव्हा त्यांच्याकडे वर्गणी देणगी मागायला कार्यकर्ते जात होते, तेंव्हा पाच-दहा हजार देणा-या खोकेबाज लोकांकडे ते रागाने पाहत होते. तुम्ही 50 खोके घेतले तर किमान एक तरी पेटी द्यायची, अश्या भावनेने कुत्सितपणे या खोकेबाज म्हणून बदनाम झालेल्या लोकप्रतिनिधी बाबत उद्गार काढून दुषणं देत होते.

आमदार रवी राणा व आमदार बच्चु कडू यांच्यात खोक्यावरून रंगलेले नाट्य शिंदे सरकारच्या विश्वसनीयतेची YZ करून‌ टाकत आहे. आव्हान – प्रतिआव्हानामुळे जनतेची करमणूक होते व जनतेचे गंभीर विषयांवरून लक्ष विचलित होत असेल‌ तर चांगलेच आहे, असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वाटत असेल. विरोधक आत्ता यांच्यात लागली, म्हणून टाळ्या पिटत असतील, असे शिंदे फडणवीस मनातल्या मनात म्हणत असतील. राणा म्हणतात बच्चु कडूंनी गुवाहाटीला खोके घेतले,त्यांनी पन्नास गुन्हे दाखल केले तरी मी घाबरत नाही.या उलट बच्चु कडू म्हणतात, राणांनी आपले आरोप सिध्द करावेत, पुरावे द्यावेत, नाही तर मी एक तारखेला काय करायचे करेन.आठ आमदार माझ्या सोबत आहेत.

आता नुकतिच एक तारीख निघून गेली त्या तारखेला बच्चु कडू यांनी आपली ताकत दाखवण्यासाठी सभा घेतली मात्र त्या अगोदर आमदार राणा यांनी आपल्या वक्तव्यावर माघार घेत माफी मागितली असल्याने बच्चु कडू यांनी औपचारिकता म्हणून या सभेत डरकाळी फोडली. पण खरंच बच्चु कडू यांच्या कडून ज्या अपेक्षा होत्या त्या त्याबद्दल ते या सभेत बोलले कां ? याचा अर्थ ते खोक्यांच्या खेळात खेळाडू होते हे स्पष्ट होते. यांचे कारण असे आहे की स्वतः महाविकास आघाडी सरकार राज्यमंत्री असलेल्या बच्चु कडू यांना अशी काय अपेक्षां होती की ते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ते गुहाहाटीला एकनाथ शिंदे सोबत गेले? एकनाथ शिंदे यांना हिंदुत्व धोक्यात आहे असं वाटलं म्हणून त्यांनी बंडखोरी केली मग बच्चु कडू हे कुठले हिंदुत्ववादी होते की त्यांचं सुद्धा हिंदुत्व धोक्यात आलं होतं ? महत्वाची बाब म्हणजे जर बच्चु कडू यांना राज्यमंत्री पद नको, आता कैबिनेट मंत्री पद हवंय म्हणून जर त्यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला तर मग शिंदे सरकार मधे त्यांना कैबिनेट मंत्री केलं नाही तरी ते गप्प कां आहे ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मीच त्यांना गुहाहाटीला जाण्यासाठी विनंती केली तर मग बच्चु कडू आपला प्रहार पक्ष किंव्हा पक्षातील निर्णय देवेंद्र फडवणीस यांना विचारून घेतात कां ?किंव्हा त्यांच्या सांगण्यावरून ते खरंच गुहाहाटीला गेलेत कां ? याबद्दल संभ्रम निर्माण होतं आहे. कारण अपक्ष १० आमदारांचं नेत्रुत्व करणारे बच्चु कडू मंत्री पद मिळाले नाही तरी गप्प आहे म्हणजे त्यांना व त्यांच्या साथीदार अपक्ष आमदारांना काहीतरी मिळाले असेलच, त्याशिवाय त्यांनी फुकटात शिंदे सरकारला समर्थन दिलं नसेल हे स्पष्ट आहे.

आता बच्चु कडू हे एकनाथ शिंदेंवर कमालीचे नाराज आहेत. सर्वात आधी बंडात सामिल होण्याचे व स्वतः सोबत 10 अपक्ष आमदारांची रसद पुरवत शिंदे च्या गद्दारीला त्यांनी बळ दिले, याचे श्रेय कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मंत्रीमंडळात त्यांचा सर्वात आधी समावेश होणे हे नैसर्गिक न्यायास धरून होते.त्यामुळे बच्चु कडू व त्यांचे सहकारी नाराज असणे स्वाभाविक आहे. जर महाविकास आघाडीत राज्यमंत्रीपदी असलेले बच्चु कडू हे आपल्या मंत्रीपदावर तुळशीपत्र ठेऊन शिंदे गटात सामिल झाले,मग त्यांना शिंदे सरकार मध्ये स्थान‌ न मिळणे अन्यायकारकच आहे.त्यामुळे बच्चु कडुंची नाराजी अनाठायी नव्हतीच. त्यांवर आमदार राणांनी बच्चु कडुंच्या भळभळत्या जखमेवर मीठच चोळले. बच्चु कडू यांनी राणा यांना आव्हान देतान 1 तारखेपर्यंतची मुदत दिली होती व त्याचवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस बजावून खोके दिले असल्यास स्पष्ट करा असे आव्हान दिले होते.पण हे आव्हान विचित्रच वाटते. कारण हे एखाद्या विवाहित महिलेस तिची कौमार्य चाचणी करून शिलवान असल्याचे सिद्ध करावयास सांगण्यासारखे आहे. जे गुवाहाटीला गेले ते सर्वच हरिश्चंद्राचे अवतार नव्हते. बहुतांश आमदार या आमिषाला बळी पडले,याबद्दल दुमत असू शकत नाही.हमाम खान्यात सर्वच नंगे असतात पण बाहेर सुटाबुटात वावरत असतात.पा़ंढ-या शुभ्र पेहरावर जे काळे डाग असतात ते अदृश्य असतात,ते सर्व सामान्य लोकांना दिसतात पण या राजकारण्यांना स्वतःला दिसत नसतात.

बच्चु कडू यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पेचात पकडले आहे. खोके दिले घेतले हे ते जाहिरपणे बोलू शकत नाहीत हे बच्चु कडू जाणून आहेत.पण दिल्या घेतल्याशिवाय इतके आमदार फुटू शकत नाहीत,हे कोणीही सुज्ञ समजू शकतो. दसरा मेळाव्याला हजारो बसेस भरून माणसांची गर्दी जमवणारे, फुकटात तीन लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार चणे फुटाण्यावर फुटतील का? आर्थिक गैरव्यवहार व आमिषांची खैरात केल्याशिवाय हे फुटाणे फुटूच शकत नाही,हे मिसुरडं‌न फुटलेलं पोरही सांगेल. अशा स्थितीत ज्या पद्धतीने बच्चु कडू हे आम्ही खोके घेतले नसल्याच्या आरोळ्या ठोकतात त्या खरंच संयुक्तिक वाटतात कां ?

बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या सभेत कार्यकर्त्यांनीच दिले पन्नास खोक्यांचे पुरावे ?

आमदार बच्चु कडू जरी आम्ही पन्नास खोके घेतले नसल्याच्या बाता करत असले तरी पन्नास खोक्यांचा विषय गंभीर बनत चालला आहे या संदर्भात जनतेला पुरावाच मिळाला आहे तो असा की बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या भर सभेत त्यांच्या कार्यकर्त्याने बांगर साहेबांना पन्नास खोक्याची ऑफर एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती दिली व नंतर शंभर कोटी सुद्धा देण्यास तयार झाले असल्याची बाब सुद्धा त्यांनी उघड केली महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी आमदार संतोष बांगर उपस्थित होते व त्यांनी याबद्दल अवाक्षरही काढले नाही. याचा अर्थ त्यांना पन्नास खोक्यांची ऑफर होती व त्यांना ते मिळाले हे स्पष्ट होते. महत्वाची बाब म्हणजे जर संतोष बांगर यांना पन्नास खोके मिळाले तर मग बच्चु कडू व त्यांच्या अपक्ष आमदारांना मिळाले नसतील कां ? हा साधा प्रश्न कुणाच्याही लक्षात येईल.

पण इकडेखोक्यावरून भांडू लागले बोकेत, तरीही मुख्यमंत्री कां म्हणतायत सब ओके?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here