कार्यकर्ता हाच पक्षाचा आधार
भाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
चंद्रपूर, दि. ६ : भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी सेवाभाव प्रथम आहे. त्यांच्यासाठी खुर्ची किंवा सत्ता महत्त्वाची नाही. कारण भाजपा पक्ष नसून एक परिवार आहे. अनेक राजकीय वादळांमधून वाट काढणाऱ्या भाजपापुढे देशातील प्रत्येकांत प्रखर राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण करणे हेच मुख्य लक्ष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, रवींद्र गुरनुले, माजी उपमहापौर राहुल पावडे, प्रकाश धारणे, रवी आसवानी, संदीप आवारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘अटलजी नेहमी म्हणायचे ‘अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा’. आज देशात सर्वत्र कमळ फुललेले आहे. भाजपचा पायाच मुळात राष्ट्रवादावर आधारित आहे. त्यामुळे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्याहीनंतर आपण स्वतः हेच भाजपचे सूत्र राहिले आहे.’ ‘भाजपसाठी कार्यकर्ता सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी विरोधक भाजप संपेल असे अहंकाराने म्हणत असायचे. आज कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष झालाय,’ या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला. ‘राजकारणात काही मायावी पक्ष लोकशाहीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना वेळीच शिक्षा करण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम करणे गरजेचे आहे. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर भाजपा बहरली आहे. पक्षाचे हे कार्य असेच ठेवायचे आहे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*भाजपचा संकल्प दिन*
भाजपमध्ये सेवेच्या वृत्तीने कार्य केले जाते. कधीही जात-पात-धर्म बघितला जात नाही. त्यामुळेच काष्ठपुजनाच्या कार्यक्रमाला मुस्लीम बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, असे सांगतानाच ना. मुनगंटीवार यांनी प्रखर राष्ट्रवादाची ज्योत प्रत्येकाच्या मनात प्रज्ज्वलित करणे हेच भाजपचे लक्ष्य असल्याचे म्हटले. त्यामुळे भाजपचा स्थापना दिन हा संकल्प दिन म्हणून साजरा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*अहंकारापासून दूर रहा*
काँग्रेसला अहंकारामुळे व स्वस्वार्थामुळे मातीमोल व्हावे लागले. त्यामुळे अहंकारापासून दूर राहण्याचे राष्ट्रभक्तीचे ‘व्हॅक्सिन’ भाजपामधील प्रत्येकाने लावून घ्यावे, असा सल्ला ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. प्रत्येक जन्मात आपल्याला भाजपाचा कार्यकर्ता म्हणून जन्म मिळावा, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करू. विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कायापालट करीत आहेत. महाराष्ट्रातही विकासाचे पर्व सुरू आहे. चंद्रपूरही विकासाच्या बाबतीत कात टाकत असून अनेक विकास कामे वेगाने सुरू असल्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
*भाजपाचा इतिहास सांगणारी पुस्तिका करा*
भाजपाचा इतिहास सांगणारी अद्ययावत पुस्तिका तयार करावी. या पुस्तिकेच्या माध्यमातून भाजपाचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे. यासोबतच भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा माहितीपटही तयार करावा, अश्या सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा भाजपला केल्या.
*विशेष सत्कार*
आणीबाणीच्या काळात कारावास भोगणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात गिरीश अणे, सुधीर टिकेकर, हेमंत डहाके, अनिल अंदनकर, नानुजी पिंपळापुरे, कृष्णा देशपांडे यांचा समावेश होता. याशिवाय भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संकल्प दिला. तत्पूर्वी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजपाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
*गंगोत्रीची जीवनदायिनी*
पूर्वी दोन नगरसेवक, दोन आमदार, दोन खासदार अशी भाजपाची स्थिती असायची. आज यशस्वी घोडदौड सुरू आहे. भाजपाच्या गंगोत्रीची आज जीवनदायीनी गंगा झाली आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता २०४७ पर्यंत ही घोडदौड सुरू ठेवायची आहे, असे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना केले.