Home चंद्रपूर १ वर्षात ४ हजार १५० तक्रारींचे निवारण : चांदा सिटी हेल्पलाईन अॅपला...

१ वर्षात ४ हजार १५० तक्रारींचे निवारण : चांदा सिटी हेल्पलाईन अॅपला उत्तम प्रतिसाद

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन अॅप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला •असुन सदर अॅपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४ हजार १७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४ हजार १५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकाभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी नागरीकांच्या तक्रारी या पत्र स्वरूपात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनास प्राप्त व्हायच्या व त्याचे निराकरण व्हावयास ही वेळ लागायचा. मात्र प्रशासनाचे कामकाज गतिमान व्हावे या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेतुन २५ ऑक्टोबर रोजी चांदा सिटी हेल्पलाईन अँपची सुरवात करण्यात आली होती.

या कार्यप्रणालीनुसार इंटरनेटच्या गुगल प्ले स्टोअरमधून चांदा सिटी हेल्पलाईन हे अॅप डाउनलोड केल्यानंतर किंवा टोल फ्री क्रमांक १८०० -१२३-७९८० येथे संपर्क करून व ८५३०००६०६३ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीत संबंधित परिसर, विभाग, तक्रार पाठवणाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, तक्रारीचे स्वरूप लिहून पाठवावे लागते. याच तक्रारीत गरज भासल्यास संबंधित तक्रारीचा फोटोही अपलोड करता येतो. चांदा सिटी हेल्पलाईन अॅपचे नाव व संपर्क क्रमांकांची प्रसिद्धी एसएमएस, फोन कॉल, ऑटो मायकिंग, सोशल मीडिया व इतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करून ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांपर्यंत हे क्रमांक पोचविण्यात आले आहे.

या अॅपवर स्वच्छता, समाज कल्याण – दिव्यांग, महिला व बालकल्याण, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, NULM, विद्युत व दिवाबत्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मोकाट जनावरे, बांधकाम, नगर रचना बिल्डींग परवाना, पाणी पुरवठा, कर, उद्यान, अवैध बांधकाम, अमृत योजना, अवैध होर्डिंग, अतिक्रमण, अग्निशमन व इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने नागरीकांना तक्रार करता येते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आता निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

अधिकारी स्तरावर तक्रार निश्चित दिवसात मार्गी लागली नाही तर हीच तक्रार पुढे टप्प्याटप्प्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होते. तक्रारींचे निराकरण कितपत झाले किंवा पेंडसी आहे का ? याचा आढावा आयुक्तांद्वारे नियमित घेतला जात असल्याने संबंधित तक्रारी त्वरेने निकाली काढल्या जात आहेत. मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत कुठलीही तक्रार असल्यास चांदा सिटी हेल्पलाईन अॅपचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here