Home Breaking News अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देऊन भरपाई देण्याचा आग्रह

मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासह महसूल मंत्री, कृषी मंत्र्यांना पत्र

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

*चंद्रपूर, दि. 27* : चंद्रपूर जिल्ह्याला 27 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आग्रह राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, कृषीमंत्री श्री. धनंजय मुंडे, महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरला सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप धानाचे, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे खोडकिडा, बुरशीजन्य रोग व विषाणूजन्य रोगामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

*ना. मुनगंटीवार यांनी तातडीने मागविली माहिती*
ना. श्री. मुनगंटीवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या जिल्ह्यातील नुकसानाची तातडीने माहिती घेतली. पालकमंत्री या नात्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे त्वरित आदेश दिले. इतकेच नव्हे तर यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे, महसूल मंत्री. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना तात्काळ पत्र देत अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावे, असा आग्रह देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांनी महसूल व कृषिमंत्री यांना केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here