अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
बल्लारपूर तालुक्यातील मोहाडी तुकूम, आसेगाव, गिलबिली येथे बुक वाटप
चंद्रपूर :- २० जानेवारी २०२४ : देशाचे भवितव्य विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. विज्ञानाचे भवितव्य अशा मुलांवर अवलंबून आहे जे मेहनतीने आणि प्रामाणिकपणे विज्ञानात चमत्कार घडवू शकतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या नाजूका आलाम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील मोहाडी तुकूम, आसेगाव आणि गिलबिली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या.
यावेळी मोवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सजीव पाझारे, आसेगावचे मुख्याध्यापक संजय डोळस, पांडुरंग बोबडे (शिक्षक), गिलबिलीचे मुख्याध्यापक शेखर वानखेडे, मोवाडीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब सिडाम, मोवाडीचे माजी सरपंच अरुण पेंदोर, समितीचे कैलास शेडमाके, तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
नाजूका आलाम म्हणाल्या, “शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वाक्याची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, माणसाच्या शिक्षणाची सुरुवात ही आईवडिलांपासून होते. नंतर समाजातील इतर घटकांकडून आणि बालवाडीतून मुलं शिकतात. त्यानंतर त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो प्राथमिक शाळा. या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन मुलं त्यांच्या आयुष्याचा पाया रचतात. तेथून ते घडत असतात आणि उद्याच्या देशाचं एक उज्वल भविष्य म्हणून डॉक्टर, इंजिनीअर, वकील घडवून एक देशाला घडवणार आहेत.”
या कार्यक्रमात नाजूका आलाम यांनी शाळांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप केले.