Home Breaking News नवनियुक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हेल्मेट, सिटबेल्टची सक्तीचे आदेश केले जारी

नवनियुक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हेल्मेट, सिटबेल्टची सक्तीचे आदेश केले जारी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

या उपक्रमाची सुरवात पोलिस विभागातील सर्व कर्मचाऱ्यांपासून करण्यात येणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी करणार कारवाई.

चंद्रपूर  :-  जिल्ह्यात रस्ता अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. यात सर्वसामान्य नागरिकांसह अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिव गमवावा लागला आहे. अपघातातील बहुतांश मृत्यू हे दुचाकीस्वारांनी हेल्मेट, तर चारचाकी चालकांनी सीटबेल्ट न लावल्याने झाल्याची बाब समोर आली आहे.

यामुळे नवनियुक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हेल्मेट, सिटबेल्टची सक्तीचे आदेश जारी केले आहेत. या उपक्रमाची सुरवात पोलिस विभागातील सर्व कर्मचाऱ्यांपासून करण्यात येत आहे.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहनाची वर्दळ मोठी आहे. सन २०२३ मध्ये रस्ते अपघातामध्ये हेल्मेट परिधान न केल्याने दुचाकीस्वारांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाला आहे. यात पोलिस अधिकारी, अंमलदार यांचाही समावेश आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्यांचे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

दुचाकी चालविताना हेल्मेट, चारचाकी चालविताना सीटबेल्ट परिधान न केल्यास पोलिसांकडून दररोज कारवाया केल्या जातात. परंतु, पोलिस अधिकारी, अंमलदार हे दुचाकी चालविताना हेल्मेट आणि चारचाकी चालविताना सीटबेल्टचा वापर करीत नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे, कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे.

परंतु, पोलिसच नियमांचे पालन करीत नसल्याने जनतेमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. यामुळे जनतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पोलिस दलाने वाहन चालविताना हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी, पोलिस अंमलदार यांनी कार्यालयात ये-जा करताना व इतर वेळीसुद्धा हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पोलिस ठाणे व शाखेत कामकाजाकरिता येणाऱ्या नागरिकांनासुद्धा या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी कारवाई करणार आहेत. तर सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आदेशाच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here