हेमामालिनी, कुमार विश्वास, रविना टंडन, श्रेया घोषाल चंद्रपूर जिल्ह्यातील प्रश्न सोडविणार का ?
लक्षवेधी ✍️
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच आमदार हे सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा उत्सव घेऊन जणू जनतेची दिशाभूल करत आहे की काय असेच वाटायला लागत आहे, कारण जिथे जिल्ह्यात अनेक प्रश्न आवासून उभे आहेत, बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे हाताला काम नसलेला तरुण युवक नशेच्या आहारी जातं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णतः झाली नाही ते बिचारे कर्जमाफिची वाट बघत आहे, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक नष्ट झाले ते सरकारी मदतीची अपेक्षा करत आहे, जिल्ह्यात औधोगिक प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले त्यावर कुठल्याही उपाययोजना होतांना दिसत नाही, जिल्हा सामान्य रुग्णालय व मेडिकल कॉलेज मध्ये पुरेसा औषधसाठा नाही व बाहेरून चाचन्या कराव्या लागत आहे त्यावर वैद्यकीय यंत्रणा कोमात जाऊन आहे, असे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न डोळ्यासमोर असतांना लोकप्रतिनिधीनी ते प्रश्न सोडवायचे सोडून उत्सव घेण्याचे त्यांना डोहाळे का लागतात हेच कळायला मार्ग नाही? महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती की त्यांनी कोट्यावधी रुपयाची सरकारी पैशाची उधळपट्टी जनतेच्या मनोरंजनासाठी करावी.
देश-विदेशात वाघ दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या वतीने चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर शुक्रवारपासून तीनदिवसीय ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला. रविवारी महोत्सवाचा समारोप होणार आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यजीव संरक्षण, पर्यटन व स्थानिक नैसर्गिक वारशाला चालना देण्यास नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला अनुसरून ताडोबा व्यवस्थापन व वन विभाग हा उत्सव करत आहे.या महोत्सवासाठी अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन, गायिका श्रेया घोषाल उपस्थित राहणार आहेत.
खरं तर हा ताडोबा उत्सव चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला प्रेरणा देणारा तेंव्हा ठरला असता जेंव्हा, ताडोबा क्षेत्रातील वाघावार वनविभागाचे नियंत्रण असतें व वाघांच्या हल्ल्यात जवळपास 219 माणसाचे जीव गेले नसते, पण जंगलात हजारो कोटी रुपयाची विकासाच्या नावावर उधळपट्टी करण्यात आली असतांना वाघावर नियंत्रण न ठेवल्यामुळे त्या जंगलातील वाघ सर्वासामान्य जनतेच्या जीवावर उठले आहे, तर मग केवळ त्यांना मेल्यानंतर मदत देऊन काय फायदा? खरंच वाघाच्या हल्ल्यात त्या मृत पावलेल्या माणसाच्या परिवाराला ताडोबा उत्सव पर्वणी ठरणारा आहे का? याचा विचार पण करायला हवा, ताडोबा वनपरीक्षेत्र जगात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे त्याचा सार्थ अभिमान चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला निश्चितच आहे, पण त्याच ताडोबा जंगलातील वाघ जनतेच्या जीवावर उठले असतील तर मरणाऱ्या माणसाच्या प्रसंगाचा उत्सव साजरा करायचा का? याचे पण विचार मंथन व्हायला हवे, विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी, कवी व प्रबोधनाकर कुमार विश्वास, अभिनेत्री रविना टंडन, श्रेया घोषाल हे सर्व कलाकार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रश्न सोडविणार का ? याचाही विचार या निमित्याने करायला हवा.