Home Breaking News शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब अद्यापही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब अद्यापही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा : दिनेश चोखारे,

पीक विम्याचे पैसे घेऊन पिक विमा कंपन्या मालामाल….

चंद्रपूर  :-  प्रत्येक वर्षी पिक विमा हप्ता भरूनही शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित राहतो. पीक विम्याचे पैसे घेऊन पिक विमा कंपन्या मात्र मालामाल होत आहेत; तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे. त्यामुळे पीक विमा भरूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येईना, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे होऊन चार महिने उलटून गेले, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा कंपन्यांकडून पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. मागील अनेक वर्षापासून शेतकरी पिक विमा भरत असतानाही तालुक्याला सातत्याने डावलण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला शेतकऱ्यांसाठी संरक्षक कवच म्हणून विमा कंपन्यांचा उल्लेख होतो, मात्र त्या शब्दाची खर्याा अर्थाने अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका असल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.

मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र त्या घोषणा हवेतच विरल्या गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

बल्लारपूर तालुक्यात जवळपास ४००२ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला असून जवळपास ३८१७ शेतकऱ्यांना पिक विमा अजून मिळाला नाही. सरकार म्हणते पैसे पाठवले तर मग शेतकऱ्यांचा खात्यात विलंब का?

असा प्रश्न उपस्थित केला जात असून पालकमंत्री यांनी याकडे लक्ष्य द्यावे आणि सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित मिळवून द्यावा. तसेच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित त्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here