Home Breaking News शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेसाठी सरसावले ना. सुधीर मुनगंटीवार

शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेसाठी सरसावले ना. सुधीर मुनगंटीवार

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

ना. मुनगंटीवार यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र

‘खरीप हंगाम २०२३’ची थकित १११ कोटी ३१ लाख रुपये तातडीने देण्याची मागणी

चंद्रपूर  :-  दि.१० – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर राहणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बाजू कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मांडली आहे. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-२०२३’च्या चंद्रपूर जिल्ह्यातील ५५ हजार ७७५ लाभार्थ्यांना १११ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी तातडीने देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत ३ लाख ५० हजार ९७६ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. या हंगामात सोयाबीन, कापूस व धान या पिकांचे अवकाळी पाऊस व रोगांमुळे नुकसान झाल्याने जिल्हयातील पिक विमा काढलेल्या
१ लाख ४३ हजार ९९१ शेतकरी लाभार्थी ठरविण्यात आले आणि त्यांना १९१ कोटी ४९ लाख ८७ हजार रुपये योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत यापैकी ८८ हजार २१६ लाभार्थी शेतकऱ्यांच्याच खात्यात विम्याचे पैसे आले आहेत. ८० कोटी १८ लाख ७८ हजार एवढी ही रक्कम आहे. उर्वरित ५५ हजार ७७५ शेतकरी १११ कोटी ३१ लाख ९ हजार रकमेच्या प्रतिक्षेत आहेत.

नव्या हंगामातील पेरणी असो वा दैनंदिन शेतीची कामे असो, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना पैश्याची आवश्यकता आहे . त्यामुळे उर्वरित ५५ हजार ७७५ शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मिळावा, अशी मागणी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ओरिएंटल इन्शूरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. विशेष म्हणजे खरीप हंगाम-२०२३ मध्ये नागपूर विभागातील सर्वाधिक लाभार्थी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून एकही शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ना. श्री. मुनगंटीवार आग्रही आहेत.

                 ‘नव्या हंगामातील पिक विमा करा’

‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४’ साठी तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून सीएससी सेंटर वरून प्राधान्याने विमा करण्याच्या सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. याशिवाय २०२३ च्या हंगामात ज्यांचा विमा नाकारण्यात आला, त्यांचेही पुनर्निरीक्षण करून अहवाल सादर करम्याचे आदेशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here