Home चंद्रपूर ज्येष्ठांचा सन्मान करणारा समाज, संस्कृतीच्या वैभवाचे प्रतीक: आ. किशोर जोरगेवार

ज्येष्ठांचा सन्मान करणारा समाज, संस्कृतीच्या वैभवाचे प्रतीक: आ. किशोर जोरगेवार

श्री वैष्णव शिंपी समाजाच्या वतीने श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-जगात वाढती वृद्धाश्रम मानव धर्म संकटात आल्याचा प्रत्यय घडवत आहेत. मात्र श्री वैष्णव शिंपी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जात आहे. आपण दरवर्षी समाजातील ज्येष्ठांचा सत्कार करता. जो समाज ज्येष्ठांना सन्मान देतो, तो समाज कधीच मागे राहू शकत नाही. आपण संत शिरोमणी नामदेव महाराजांचे खरे पाईक असून, ज्येष्ठांचा सन्मान करणारा शिंपी समाज संस्कृतीच्या वैभवाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
श्री वैष्णव शिंपी समाजाच्या वतीने शिंपी समाज भवन येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष सुहास बहादे, उपाध्यक्ष संजय तुरिले, सचिव प्रवीण जोगडे, कोषाध्यक्ष नरेश रेभनकर, प्रदीप जुमडे, शिलाताई पिंझनकर, कपीश कोहडे, अविनाश रेभनकर, संजय टिकले, बल्लू जुमडे, राजू लांडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिंपी हा कष्टकरी समाज आहे. आपण नेहमी समाजाची सेवा केली आहे. मात्र समाजाने आता आपला हक्क मागण्यासाठी पुढे आले पाहिजे. या समाजात प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. आपण शिक्षण क्षेत्रात समाजाचे नाव उज्ज्वल करावे. आज ज्येष्ठ नागरिकांचा येथे सत्कार केला जात आहे. ज्येष्ठांच्या अनुभवी विचारांचाही समाजाला नक्कीच फायदा होणार आहे. समाजात ज्येष्ठांचा सन्मान व्हायला पाहिजे. आपण ज्येष्ठ नागरिकांना “जुन फर्निचर” सिनेमा दाखवला. यावेळी ज्येष्ठांसोबत अधिकचा सहवास लाभला आणि त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
श्री नामदेव महाराजांनी आपल्या जीवनातून समाजातील विषमता, अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य केले. त्यांनी आपल्या विचारांमध्ये एकात्मता, श्रद्धा आणि सेवाभावाचे महत्त्व दिले. त्यांच्या कीर्तनातून त्यांनी भक्तांमध्ये ईश्वरप्रेम, सेवा आणि एकात्मतेचा संदेश दिला. “ईश्वर सर्वत्र आहे, तो आपल्या हृदयात आहे,” असे ते म्हणत, आणि या विचाराने त्यांनी समाजातील प्रत्येकाला ईश्वराच्या प्रेमात रंगवले.
आज आपण त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेतो, त्यांची शिकवण आपल्या जीवनात आणण्यासाठी संकल्प करतो. त्यांच्या जीवनात जसे ते समाजसेवेसाठी आणि धर्मसेवेसाठी तत्पर होते, तसेच आपणही आपल्या समाजातील गरजूंच्या सेवेसाठी आणि ईश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित होण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here