Home Breaking News नवीन सुरक्षा उपायांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भेटण्याच्या नियमांमध्ये बदल

नवीन सुरक्षा उपायांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भेटण्याच्या नियमांमध्ये बदल

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

रुग्णांना भेटण्याकरिता देण्यात येईल टाईम सोबत पास असणे आवश्यक

चंद्रपूर  :-  24 ऑगस्ट 2024 – जिल्हा सामान्य रुग्णालयात (जीएमसी) नवीन सुरक्षा उपायांसह भेटण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे रुग्णांना भेटण्याकरिता पास बंधनकारक केले जाईल. या पासांच्या माध्यमातून रुग्णालयात विनाकारण गर्दी टाळण्यात मदत होईल.

नियमानुसार, रुग्णांना भेटण्याकरिता दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पास आवश्यक आहे. रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर, त्यांच्या नातेवाईकांना हिरव्या आणि लाल रंगाचे पास देण्यात येतील. हिरव्या रंगाचा पास रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांसाठी आहे, तर लाल रंगाचा पास इतर नातेवाईकांसाठी आहे जे भेटीसाठी नेमून दिलेल्या वेळेत येतील.

पासची वैधता 7 दिवसांसाठी असेल आणि ते हरवल्यास 50 रुपये दंड आकारण्यात येईल. रुग्ण सुट्टी मिळाल्यानंतर, त्यांनी पास वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे जमा करणे आवश्यक आहे.

तसेच, रुग्णालय परिसरात धूम्रपान करणे, पान, गुटखा, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना किंवा थुकताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

बाहेरील वाहनांना प्रवेश निर्बंध :

रुग्णालय परिसरामध्ये विनाकारण बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त रुग्णांची ने-आण करण्याकरिता मर्यादित वेळेसाठीच बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वाहन पासेस उपलब्ध करुन दिल्या जाईल सदर पासच्या आधारे त्यांना रुग्णालयात वाहनासह प्रवेश देण्यात येईल.

विनापरवानगी फोटो / व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई :-

रुग्णालयाच्या आत तसेच परिसरात विनापरवानगी फोटो तसेच व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई असून असे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. फोटो किंवा व्हिडिओग्राफी करायची असल्यास वैद्यकीय अधीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊनच काढण्यात यावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन :

जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तैनात झालेले सुरक्षा रक्षक, रुग्णालय प्रशासन, तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here