नैतिकता व स्वाभिमान बासनात गुंडाळून संधी मिळताहेत म्हणून पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी ठेचून काढायला हवे का?
लक्षवेधी :-
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला स्वतःच्या पक्षात संधी मिळणार नाहीं म्हणून इतर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना लालच देऊन पक्ष प्रवेश करणारे अनेक पक्षातील उपरे यांची विधानसभा निवडणुकीत दावेदारी करणाऱ्यांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढायला लागली आहे, काही उपरे तर असे आहेत की त्यांचे स्वतःचे सामाजिक कुठलेही कार्य नसताना व नेत्यांना अपेक्षित कर्तृत्व व नेतृत्वगुण नसताना आपली नैतिकता आणि स्वाभिमान बासनात गुंडाळून ठेवत उमेदवारीसाठी राजकीय लोटांगण सुरु आहेत. समाजाहिताचे प्रश्न सोडविण्याची धमक व पात्रता नसणाऱ्या अशा उपऱ्या उमेदवारांना मतदारांनी ठेचून काढायला हवे अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
जो तो राजकारणात यशस्वी होण्यासाठी “घालीन लोटांगण वंदिन राजकारणं” करत पैशाच्या बळावर व पक्षाच्या अंतर्गत वादाचा फायदा उचलत संभावित संधी बघता पक्ष प्रवेश करून विधानसभेची दावेदारी करताहेत, जी नैसर्गिकरित्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर अन्याय करणारी ठरत आहे, महाराष्ट्रातलं राजकारणं एवढं बिघडलं की मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास राज्याच्या राजकारणाचा असा चुकीचा कैरम फुटला की कुणाची गोटी कुणाच्या भोकात आहे हेच कळतं नाहीं.
कार्यकर्ते ‘पालखीचे भोई का?
वर्षानुवर्षे इमानेइतबारे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ऐनवेळी बाजूला ठेवून इतर पक्षांतील उपऱ्यांना काही राजकीय पक्ष पदाधिकारी छडयंत्र रचून संधी देतात हे कधी कधी पक्षाच्या हिताचे नसतात व त्यामुळे मूळ पक्षातील कार्यकर्त्यात चीड निर्माण होतं असते पर्यायाने पक्षात मग निष्ठावंत उमेदवार बंडाखोरी करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे पक्षाचा उमेदवार पडतो असे नेहमी घडत आले आहे, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात तर याचे अनेक उदाहरणं आहेत, ज्या डॉ. अनिल बुजोने यांनी शिवसेनेची बांधणी केली व शिवसेना पक्ष गावागावात पोहचवीला त्यांना डावलून बाहेरच्या किशोर डांगे यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी डॉ अनिल बुजोने यांच्यावर अन्याय झाला ही भावना प्रत्येक शिवसैनिकांत होती त्यामुळे किशोर डांगे यांची जमानात जप्त झाली तर बंडखोरी करणारे डॉ. अनिल बुजोने यांना तब्बल 42 हजार मतदान पडून तत्कालीन विजयी उमेदवार संजय देवतळे यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली, जर त्यावेळी डॉ. अनिल बुजोने यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली असती तर ते निश्चितपणे निवडून आले असतें, दरम्यान 2014 मध्ये भाजप कडून ओम मांडवकर यांना उमेदवारी जाहीर झाली पण ऐनवेळी कांग्रेस च्या संजय देवतळे यांना भाजप ने उमेदवारी दिली आणि ती निवडणूक भाजप हरले पण भाजप निष्ठावंत ओम मांडवकर यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले असतें, दरम्यान या घटनावरून कार्यकर्ते केवळ सतरंज्या उचलण्यासाठी व पक्षाचे झेंडे खांद्यावर वाहण्यासाठी वापरले जातात. ऐनवेळी पक्षात येऊन उमेदवारी मिळवायची व निवडणुकीत अपयश आले की, पुढच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षांशी घरोबा असा प्रकार सुरू आहे. यावेळी अशीच परिस्थिती दिसत असून निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देणे सहजशक्य असताना सर्वच पक्षांनी त्यांना पालखीचे भोई बनवण्यात समाधान मानावे का हा प्रश्न उपस्थित होतं आहे.
आता मतदारांनीच त्यां उपऱ्यांना मतदानाच्या माध्यमातून ठेचून काढायला हवे..
खरं तर सर्वच राजकीय पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी उमेदवारीचे निकष जाहीर करायला हवे. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना उमेदवारी हा निकष असेल तर मग पक्षवाढीसाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन परिश्रम करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांचे काय? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. दरम्यान राजकारणात पैसा हाच निकष असेल व राजकीय नीतिमत्ता गुंडाळून कोलांटउड्या मारून उमेदवारीसाठी लाचार होणाऱ्यांना उमेदवारी मिळतं असेल तर मग निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज ती काय? कुणासाठी आणि कशासाठी निष्ठा जोपासायची? त्यापेक्षा सामाजिक सेवेतून स्वतःची उमेदवारी जनतेने जाहीर केली तरच निवडणूक लढायची हा विचार आता सामाजिक कार्यातून राजकारणं करणाऱ्यांनी समजून घ्यायला हवा.
पक्षाची तत्त्वे बासनात बांधून बाहेरील उपरे यांना उमेदवारी हा निकष सर्वत्र दिसत असल्याने व मतदारांना गृहीत धरून राजकीय पक्षांची जी मस्ती सुरु आहे ती मस्ती उतरविण्यासाठी आता मतदारांनीच त्यांना मतदानांच्या माध्यमातून ठेचून काढायला हवे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलविणाऱ्या उपऱ्यांना सबक शिकवायला हवी तरच संधीसाधू ह्या उपऱ्यावर अंकुश लागेल.