हेल्मेटसक्तीवर फेरविचार आवश्यक: रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी संपूर्ण प्रणाली सुधारण्याची गरज…
महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो – अपघात टाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत का?
चंद्रपूर :- हेल्मेटसक्तीच्या मुद्द्यावर विचार करतांना, एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो – अपघात टाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? सध्याची स्थिती पाहता, हेल्मेटचा उपयोग अपघात झाल्यावरच लक्षात येतो, पण या अपघातांची कारणे मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या अराजकतेत, नादुरुस्त रस्त्यांमध्ये आणि बेशिस्त वाहतुकीत आहेत.
News reporter :- अतुल दिघाडे
रस्त्यांवरील खड्डे, अव्यवस्थित बांधकाम साहित्य, अनधिकृत अतिक्रमण आणि मोकाट जनावरे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर बेशिस्त वाहनचालक आणि पोलीस कारवाईचा अभाव हे इतर मोठे कारण आहेत. काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण करतात, तरीही पोलीस या बेशिस्त चालकांवर कारवाई करत नाहीत.
दुसऱ्या बाजूला, हेल्मेटसक्तीच्या लागू होण्याने काही विशिष्ट गटांना त्रास होऊ शकतो, जसे की वृद्ध नागरिक आणि ज्यांना शारीरिक समस्या आहेत. आणि दुसरे, हेल्मेट नसल्यास दंड होईल या भीतीने लोकांच्या मनात ताण निर्माण होतो.
समाजधुरिणांनी या विषयावर योग्य विचार केला पाहिजे, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाची आणि पोलिसांची कारवाई अधिक प्रभावी होणे आवश्यक आहे. मात्र हेल्मेटसक्तीची गरज आहे का, हे समजून घेतल्यावरच योग्य निर्णय घेण्यात येईल.