पावसाळ्यापूर्वी मनपाचे महत्त्वाचे पाऊल: चंद्रपूरातील 54 जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीस; संभाव्य धोका टाळण्यासाठी विशेष पथक तयार
चंद्रपूर :- दि. २७ मे, चंद्रपूर महानगरपालिकेने शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींविरोधात मोठे पाऊल उचलले असून, एकूण ५४ इमारतींना नोटीस बजावून त्या तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. हे पाऊल आगामी पावसाळ्यादरम्यान संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उचलण्यात आले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
प्राप्त माहितीनुसार, झोन क्र. 1 मधील 28 इमारती, झोन क्र. 2 मधील 16 इमारती आणि झोन क्र. 3 मधील 10 इमारती अशा एकूण 54 इमारतींना धोकादायक घोषित करून महानगरपालिकेने नोटीस बजावल्या आहेत. या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, पावसाळ्यात कोसळण्याचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये, यासाठी मनपाने ही कारवाई केली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवार यांनी या बाबतीत गांभीर्य दाखवत पुढाकार घेतला असून, या कामासाठी विशेष सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक शहरातील अशा इमारतींचा सर्वे करून त्यांना तातडीने खाली करण्याची शिफारस करत आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्यानंतर धोकादायक इमारती पाडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पालीवार यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळून मोठे अपघात होतात. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हे पाऊल उचलले आहे. ही कारवाई केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर नागरिकांनी देखील सहकार्य करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.”
शहरातील नागरिकांनीही सजग राहण्याचे आवाहन
मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे, त्या इमारती रिकाम्या करून दुसरीकडे राहण्याची तात्पुरती व्यवस्था करावी. तसेच जीर्ण इमारतींसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास, ती तातडीने महानगरपालिकेला कळवावी, जेणेकरून त्वरित कारवाई करता येईल.
या उपक्रमामुळे चंद्रपूर शहरात संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होणार असून, नागरिकांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.