शिक्षण वार्ता ;
अकरावीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची: विद्यार्थ्यांपासून इन्स्टिट्यूट्सपर्यंत चिंतेचं वातावरण
चंद्रपूर :- राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी वर्गासाठी आधार आधारित बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केल्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामागे उद्देश स्पष्ट आहे – विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे आणि शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलतींमध्ये पारदर्शकता आणणे. मात्र, या नव्या प्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हानं उभी राहिली आहेत.
News reporter :- अतुल दिघाडे
इन्स्टिट्यूट्स आणि विद्यार्थ्यांची अडचण वाढली
सध्या अनेक विद्यार्थी नाममात्र कॉलेजमध्ये प्रवेश घेतात आणि प्रत्यक्ष शिक्षण ‘क्रॅश कोर्स’च्या माध्यमातून खासगी शिकवणी इन्स्टिट्यूट्समध्ये घेतात. मात्र, आता बायोमेट्रिक हजेरी सक्तीची झाल्याने त्यांना दररोज कॉलेजला उपस्थित राहणं भाग पडलं आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट्सचा वेळ आणि अभ्यासक्रम दोन्ही धोक्यात येणार असल्याची चिंता वाढली आहे.
तांत्रिक अडथळे – अंमलबजावणीतील मोठा प्रश्न
राज्यभरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अद्याप बायोमेट्रिक यंत्रणाच कार्यरत नाही. काही ठिकाणी मशीन बंद असतात, अंगठ्याची ओळख न होणे, इंटरनेटची अडचण, यामुळे उपस्थिती नोंदवता न आल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यंत्रणेतील बिघाडामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती चुकीची नोंदवली जाऊ शकते, जे त्यांच्या योजनांच्या लाभावर थेट परिणाम करु शकते.
‘थम्ब अटेन्डन्स’शिवाय योजना बंद
शिष्यवृत्ती, वसतिगृह, पोषण आहार, शिक्षण सवलती या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता थम्ब अटेन्डन्स अनिवार्य ठरली आहे. परिणामी जर विद्यार्थी उपस्थित असतानाही तांत्रिक त्रुटींमुळे हजेरी लागली नाही, तर त्याला योजनांचा लाभ मिळणार नाही, ही विद्यार्थ्यांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २० हजारांहून अधिक विद्यार्थी
चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास २० हजार अकरावीच्या जागा असून, यंदा २४,०२५ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरु असून, विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करावी लागत आहे.
शासनाचा हेतू सकारात्मक, पण अंमलबजावणी कठीण
या निर्णयामागे शासनाचा उद्देश विधायक असला तरी त्याची अंमलबजावणी करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंत्रणा सक्षम करणे, शिक्षक आणि महाविद्यालय कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण देणे, तसेच इन्स्टिट्यूट्स व कॉलेज यांच्यात समन्वय साधणे गरजेचे ठरत आहे.