Home चंद्रपूर खळबळजनक :- मुलाने दारूच्या नशेत केला बापाचा खून, समाजमन हादरले.

खळबळजनक :- मुलाने दारूच्या नशेत केला बापाचा खून, समाजमन हादरले.

शेतीच्या शुल्लक कारणावरून जन्मदात्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनकघटना सुन्न करणारी.
चंद्रपूर/वरोरा (धनराज बाटबरवे):-

चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिनांक २३.०६.२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास बिनबा वॉर्ड येथे शेतीच्या वादातून एका मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली.

या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव ताराचंद उर्फ दारासिंग बाबुसिंग बैस (वय ६२ वर्षे) असे आहे. त्यांची वरोरा येथील मोवाडा येथे वडिलोपार्जित शेती होती. सदर शेतीच्या वाटणीवरून त्यांचा मुलगा आणि या घटनेतील आरोपी, मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस (वय ३० वर्षे), हा नेहमी घरात वाद घालत असे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३.०६.२०२५ रोजी रात्री ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी मुन्ना दारू पिऊन घरी आला. जुन्या शेतीच्या वादावरून त्याने वडिलांसोबत जोरदार भांडण सुरू केले. भांडण विकोपाला गेल्याने आरोपीचा राग अनावर झाला आणि त्याने घरातून एक अवजड धारदार शस्त्र घेतले. त्या शस्त्राने त्याने वडील ताराचंद यांच्या तोंडावर, डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर वार केले, ज्यामुळे ताराचंद यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले आणि मृतदेह चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुन्नाला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४३४/२०२५, कलम १०३ (१) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, नयोमी साटम, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवने आणि चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here