Home चंद्रपूर चिमुकल्या रेणुकाच्या मदतीसाठी निलेश लोणारे यांचा पुढाकार – ९ हजारांची आर्थिक मदत

चिमुकल्या रेणुकाच्या मदतीसाठी निलेश लोणारे यांचा पुढाकार – ९ हजारांची आर्थिक मदत

चिमुकल्या रेणुकाच्या मदतीसाठी निलेश लोणारे यांचा पुढाकार – ९ हजारांची आर्थिक मदत
एक झिजलेल्या खांद्यांना दिलासा देणारी माणुसकीची जिवंत उदाहरण

पोंभुर्णा  :-  अनाथतेच्या अंधारात अडकलेल्या चिमुकल्या रेणुकाच्या आयुष्यात माणुसकीचा दीपप्रकाश झाला आहे. उमरी पोतदार येथील रेणुका कोडापे या छोट्याशा मुलीच्या परिस्थितीची व्यथा ‘पुण्य नगरी’मध्ये प्रकाशित होताच, मदतीचे हात पुढे सरसावले. चंद्रपूर येथील साई प्लंबिंगचे निलेश लोणारे यांनी तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी ९ हजार रुपयांची मदत केली आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

रेणुकाचे आयुष्य सुरुवातीपासूनच खडतर राहिले आहे. वडिलांचे छत्र तिने जन्माच्या आधीच गमावले आणि लहानपणीच आईचा आधारही हरपला. अशा परिस्थितीत ७५ वर्षीय आजी जैवंतुबाई कोडापे यांच्या झिजलेल्या खांद्यावर तिच्या संगोपनाची जबाबदारी आली. यावर्षी रेणुकाने पहिलीत पाऊल ठेवले असले, तरी तिच्या पाठीशी आधार बनणाऱ्या हातांची गरज अजूनही तितकीच तीव्र आहे.

‘पुण्य नगरी’ने १० जुलैच्या अंकात रेणुकाच्या जीवनातील संघर्षाला शब्द दिले आणि त्यावर पहिला प्रतिसाद दिला तो निलेश लोणारे यांनी वृत्त वाचल्यानंतर त्वरित संपर्क साधत ९ हजार रुपयांची मदत करण्याचा संकल्प केला. लोणारे यांनी उमरी पोतदार येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्ष जाऊन रेणुकाला आजीच्या उपस्थितीत ही मदत सुपूर्द केली.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुशील गव्हारे, सहाय्यक शिक्षक अरुण कोवे, सुरेश कावरे, संजय झोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे कालिदास ठाकरे, कपिलदास ठाकरे, तसेच उपसरपंच मंगेश उपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निलेश लोणारे हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. यापूर्वीही त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सलग सात-आठ वर्षे शाळेच्या वस्तू वाटप केल्या आहेत, तर एका विद्यार्थिनीच्या शैक्षणिक खर्चाचीही जबाबदारी उचलली होती.

रेणुकाच्या भविष्याला आकार देण्यासाठी अजूनही अनेक हात पुढे येण्याची गरज आहे. एका अनाथ चिमुकलीचे जीवन उजळवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला, तर रेणुकासारख्या अनेकांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळू शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here