Home चंद्रपूर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ताडाळी गावात गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात साजरा – दिनेश चोखारे

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ताडाळी गावात गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात साजरा – दिनेश चोखारे

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ताडाळी गावात गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात साजरा – दिनेश चोखारे

भक्ती, एकोपा आणि पारंपरिक उत्साहाचे दर्शन; दहीहंडी, भजन-कीर्तन, गोपाळकाला प्रसाद वितरणाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालं 

 

चंद्रपूर (ताडाळी), दि. 19 ऑगस्ट :-  श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ताडाळी गावात आयोजित करण्यात आलेला गोपाळकाला कार्यक्रम यंदा अधिकच उत्साह, भक्तीभाव आणि पारंपरिक वेशात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे गावात एकोपा, सांस्कृतिक जाणीव आणि धार्मिकतेचं एक सुंदर चित्र उभं राहिलं.

News reporter :- अतुल दिघाडे

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मंदिरातील श्रीकृष्ण पूजन व अभिषेकाने झाली. यानंतर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिर परिसर भक्तिभावाने नटलेला दिसून आला. रंगीबेरंगी फुलांची सजावट, टाळ-मृदुंगाच्या गजरात होणारे भजन-कीर्तन आणि ‘जय श्रीकृष्ण’ च्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गोपाळकाला गीते गात वातावरणात आनंदाची भर घातली. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. त्यांनी गायलेल्या पारंपरिक गाण्यांनी आणि रांगोळी-सजावटींनी कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी मंडळाच्या वतीने गोपाळकाला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. तरुणांनी थर लावून दहीहंडी फोडली आणि कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला. दही, पोहे, गूळ, काकडी, नारळ यांचा मिश्र ‘काला’ संपूर्ण गावकऱ्यांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला. प्रसादासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादापाटील चोखारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत गावातील अनेक मान्यवर – हेमराज दिवसे, चंदू खंडारकर, राजू दिवसे, डॉ. वराटे, अनिल पारखी, प्रभाकर पारखी, विशाल चौधरी आदींची उपस्थिती होती.

गावातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ मंडळी यांनी सामूहिक सहभाग देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रत्येक कार्यात गावकऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सर्व मंडळांनी, स्थानिक संस्थांनी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे गावात एकात्मता, धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ताडाळी गावात पारंपरिकतेची जाण आणि सामाजिक ऐक्याचा एक उत्तम आदर्श या गोपाळकाला उत्सवाने उभा केला आहे. भविष्यातही अशा कार्यक्रमातून गावातील एकोपा अधिक दृढ होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here