Home विदर्भ काळाची गरज ओळखून नागपूर शहरात रेल्वेचे एक अद्यावत मध्यवर्ती रूग्णालय व विद्यालय...

काळाची गरज ओळखून नागपूर शहरात रेल्वेचे एक अद्यावत मध्यवर्ती रूग्णालय व विद्यालय बांधा !

मनसे जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस महेश जोशी यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे मागणी !

येणा-या काळाची वैद्यकीय गरज तसेच जनतेला अद्यावत वैद्यकिय सुविधा उपलब्ध व्हावी त्याचबरोबर वैद्यकिय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी नागपूरात रेल्वेचे एक अद्यावत मध्यवर्ती रुग्णालय व विद्यालय बांधण्यात यावे ह्यासाठी नागपूर शहरात मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या मुबलक जागेत मध्यवर्ती रेल्वे रुग्णालय बांधण्यात यावे ह्यासाठी  पियुष गोयल, केंद्रिय रेल्वे मंत्री, भारत सरकार यांना मनसे जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस महेश जोशी यांनी मेलद्वारे निवेदन सादर केले ज्याची प्रतिलिपी मा. पंतप्रधान  नरेंद्र मोदी,  खासदार व केंद्रिय भूपृष्ठ मंत्री नितिनजी गडकरी, मनसे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे, मनसे महाराष्ट्र सरचिटणीस व जनहित व विधी कक्षाचे अध्यक्ष  किशोर शिंदे  तसेच  महाव्यस्थापक, मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर व बिलासपूर व मा. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर यांना सुद्धा  देण्यात आली.

निवेदनात  पुढे म्हटले आहे की नागपूर शहराचे भौगोलिक महत्व तसेच रेल्वे विभागाकडे उपलब्ध असलेली मुबलक रिकामी जागा याकडे केंद्रीय रेल्वे मंत्री  पियुषजी गोयल यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.

नागपूर हे भारताचे मधतावर्ती ठिकाण असून नागपूर शहरात मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय आहे. खरंतर काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाचे जेंव्हा विभाजन करण्यात आले तेंव्हाचं नागपूर शहराच्या मध्यवर्ती स्थानाचे महत्व विचारात घेता नागपूर शहरात एक वेगळे महाव्यवस्थाक कार्यालय सुरु होईल अशी अपेक्षा होती. परंतु, नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील सत्ताधारी तसेच विरोधी खासदार/राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा आभाव, त्यांची दिल्लीश्वरांसमोर नतमस्तक व्हायची मानसिकता, तसेच राजकीय दबाव कमी पडल्यामुळे हे ऑफिस जबलपूर येथे स्थापित करण्यात आले हे महाराष्ट्राचे तसेच नागपूरचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. महाराष्ट्राला नवी दिल्ली कायमचं गृहीत धरत आलेली आहे हे पुन्हा सिद्ध झाले. आज परिस्थितीत बऱ्यापैकी सकारात्मक बदल जाणवत असला तरी परिस्थिती जशी हवी तेव्हढी आशादायक आहे असे म्हणता येणार नाही असे निवेदनात प्रकर्षाने नमूद करण्यात आले.

देशात थैमान मांडलेल्या कोरोना सौंसर्गापायी बरेच प्रश्न, खास करून वैद्यकीय प्रश्न हे ऐरणीवर आले असून काही गोष्टींची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबई मधील भायखळा येथे मध्य रेल्वेचे मध्यवर्ती रुग्णालय असून रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी विशेष वैद्यकीय तसेच आकस्मिक उपचार करावयची व्यवस्था ह्या रुग्णालयाद्वारे केली जाते. सहाजिकच, ह्या रुग्णालयावर प्रचंड ताण असून रुग्णांच्या गर्दीपायी रुग्णांना मिळणाऱ्या उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांचा आभाव जाणवतो. रेल्वेकडे अद्यावत रुग्णालय उपलब्ध असून देखील रुग्णाच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा स्थानिक पातळीवरील रेल्वे अधिकृत/नोंदणीकृत रुग्णालयांचा आधार घेऊन रुग्णांना तेथे दाखल करण्यात येते. सहाजिकच, अश्या रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा रेल्वे प्रशासनाद्वारे केला जातो, जो प्रचंड असतो. असे असून देखील रेल्वे प्रशासनाने आज पर्यंत दुसऱ्या नवीन अत्याधुनिक रुग्णालयाचा विचार करू नये ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. रेल्वे साठी अर्थसंकल्पात प्रचंड आर्थिक तरतूद असताना, रेल्वे अत्याधुनिकिकरण व आपले कर्मचारी व प्रवाश्यांच्या सोई सुविधांसाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करीत असताना एक नवीन अत्याधुनिक रुग्णालय सुरु करणे ही निश्चितचं अभिनंदनीय बाब ठरेल. याद्वारे मी आपले लक्ष तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री मा. सुश्री ममता बॅनर्जी यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे वेधू ईच्छितो ज्यात त्यांनी नागपूर येथे रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जागेवर रेल्वे रुग्णालय व विद्यालय बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता परंतू राजकीय अनास्थेपायी हा प्रस्ताव नंतर बारगळला. त्यावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत तसेच भविष्याची गरज लक्षात घेऊन रुग्णालय कार्यरत झाले असते तर आज कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत शासकीय वैद्यकीय रुग्णालयांबरोबरच रेल्वे रुग्णालय संपूर्ण कार्यक्षमतेने रुग्णांची सेवा करताना दिसले असते ह्या परिस्थितीची जाणीव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदनातून करून देण्यात आली.

खरंतर, २०१६ पर्यंत देशात वेगळा रेल्वे अर्थसंकल्प सादर होत असताना, रेल्वेच्या करोडो कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सोईंचा विचार करून तसेच जनहित लक्षात घेऊन स्थानिक जनतेला ह्या रुग्णालयाचा वैद्यकीय लाभ घेता यावा ह्या उदात्त हेतूने देशात विविध मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक रुग्णालय व विद्यालय सुरु होणे अपेक्षित असताना वैद्यकीय सेवेसारख्या अती महत्वाच्या बाबीकडे रेल्वे प्रशासनाने का दुर्लक्ष केले असेल हा प्रश्न जनतेत उपस्थित होतो, जो साहजिकच आहे हे निवेदनात खेदाने नमूद करण्यात आले.

एकूणच भारत देशाची वाढती लोकसंख्या विचारात घेता वैद्यकीय शिक्षण घेऊन सेवा देण्यास तयार झालेले चिकित्सक तज्ञ, परिचारक, परिचारिका, पॅरामेडीकल तज्ञ इत्यादिंची संख्या हि अत्यल्प आहे. उत्कृष्ठ वैद्यकीय सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून देशाची आजची उपलब्ध वैद्यकीय सेवा विचारात घेता जनता खास करून गरीब जनता ह्या हक्कापासून वंचित आहे असे म्हटले तर ते गैर ठरणार नाही. रेल्वे रुग्णालय व विद्यालय सुरु झाल्यास वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढून वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या तज्ञांची संख्या निश्चित वाढेल. त्याचप्रमाणे कमी वैद्यकीय प्रवेशामुळे ज्यांना वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य होतं नाही, वैद्यकीय शिक्षणापासून परावृत्त व्हावे लागते अश्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी प्राप्त होऊन शिक्षण घेणे सहज शक्य होईल असे निवेदनाद्वारे आवर्जून सांगण्यात आले.

नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असून ह्या शहराला तीन मोठ्या राज्यांच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश सीमा लागून आहेत. नागपूर हे रेल्वेचे जंक्शन असून येथूनच ट्रेन नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई साठी दिशा बदलतात आणि त्याचमुळे नागपूर रेल्वे स्थानकावरून दिवस भरात २५० प्रवासी रेल्वे गाड्या व मोठ्या संख्येत मालगाड्यांचे अवागमन सुरु असते. त्याशिवाय, नागपूर शहरात दोन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची कार्यालये (मध्य व दक्षिण पूर्व मध्य) असून मोठ्या संख्येत कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. वरील सर्व बाबींचा विचार केल्यास नागपूर शहराला भौगोलिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व प्राप्त असून अश्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेचे एक अत्याधुनिक वैद्यकीय रुग्णालय व विद्यालय असणे ही काळाची गरज आहे. नागपूर शहराचे भौगोलिक महत्व लक्षात घेऊन नागपुरात AIIMS, NIPER सारख्या अत्याधुनिक वैद्यकीय संस्था बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्या आज उत्तम प्रकारे संपूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, ज्याचे श्रेय नागपूर लोकसभा खासदार  नितीन गडकरी यांना द्यावेच लागेल असे निवेदनात आवर्जून नमूद करत नागपूर शहराचे भौगोलिक महत्व निवेदनाद्वारे मा. मंत्री महोदयांना स्पष्ट करण्यात आले.

नागपूर येथे रेल्वे वैद्यकीय रुग्णालय व विद्यालय स्थापित झाल्यास पूर्व व पश्चिम विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यातील नागरिक त्याचप्रमाणे नागपूर पासून साधारण ४०० कि.मी. पर्यंत असणारी सर्व प्रमुख व इतर लहान मोठी स्थानके तसेच दोन्ही विभागीय व्यवस्थापक कार्यालयांतर्गत मोठ्या संख्येत येणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सामान्य जनता यांना ह्या रुग्णालयाद्वारे उत्तम वैद्यकीय व्यवस्था देणे शक्य होईल, ज्यामुळे मोठ्या आजारांसाठी रुग्णांना मुंबई रेल्वे रुग्णलय अथवा स्थानिक खाजगी रुग्णालयात पाठवायची गरज भासणार नाही, ज्यामुळे वेळेची बचत होतं तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचे जीव वाचतील. त्याचबरोबर, रेल्वेला खाजगी रुग्णालयांना द्यावी लागणारी आर्थिक परतफेड वाचून आर्थिक फायदा पण होईल असे निवेदनात नमूद करत एकूण परिस्थिचा गांभीर्याने विचार करता येणाऱ्या काळाची गरज व जनहित लक्षात घेऊन निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली कि सन २०२०-२१ अर्थसंकल्पात रुग्णालयासाठी विशेष तरतूद करून, नागपूर शहरात रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जागेत एक अत्याधुनिक व भव्य वैद्यकीय रुग्णालय व विद्यालय बांधून विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यात यावा अशी मागणी सुद्धा महेश जोशी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here