तर १३० कोटी भारतीयांना लॉकडाऊन व्हावे लागले नसते – डॉ अभय बंग यांचे मत !
देशातील मोदी सरकार म्हणजे जुन्या चाली परंपरा आणि अंधश्रद्धेला बळ देणारं आणि देशातील जनतेला भ्रमीत करणार सरकार ठरलं आहे. थाळ्या वाजवा व दिवे लावा यासारख्या तथ्यहिन गोष्टी जनतेला करायला लावून मूर्खपणाचे कळस गाठणार हे सरकार कुठे चुकलं याबद्दल अनेक एक्सपर्टनी आणि समाजसेवक यांनी वेळोवेळी जनतेसमोर भूमिका मांडल्या पण देशातील प्रसारमाध्यमांनी आपल्या स्वार्थासाठी केवळ मोदींचा उदोउदो चालविला आहे.
खरं तर जगात करोनाची साथ पसरत होती त्यावेळी परदेशातून भारतात आलेल्या ३० ते ४० लाख लोकांची चाचणी केली असती व त्यातील आवश्यक त्यांना लॉकडाऊन केले असते तर आज १३० कोटी भारतीयांवर लॉकडाऊन होण्याची वेळच आली नसती, असा घणाघात विख्यात समाजसेवक डॉ अभय बंग यांनी केला आहे.
परदेशातून भारतातील विविध शहरातील विमानतळावर उतरलेल्यांची तेव्हाच खरेतर चाचणी व्हायला हवी होती. कदाचित तेव्हा एवढ्या संख्येने चाचणी करण्याची व्यवस्था नसल्याने चाचणी झालीही नसेल परंतु दोन लाख लोकांच्या हातावर शिक्के मारून घरी क्वारंटाईन व्हायला सांगितले व काही हजारच लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या. तेव्हाच जर परदेशातून आलेल्या लाखो प्रवाशांना क्वारंटाईन करून तपासले असते तर १३० कोटी भारतीयांवर आज लॉकडाऊन होण्याची वेळ आली नसती असे ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत डॉ अभय बंग यांनी सांगितले.
भारत सरकारने त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायातून लॉकडाऊनचा पर्याय सर्वोत्तम म्हणून निवडला असला तरी काही तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊन हा काही ठोस पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे खरोखर किती फायदा झाला याला ठोस आधार नाही. माझ्या मते लॉकडाऊन ज्याप्रकारे जाहीर करण्यात आला ती आदर्श पद्धती निश्चितच नाही. त्याचे परिणाम आपण उत्तर प्रदेश, बिहार तसेच काल वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ बघितले, असेही बंग यांनी सांगितले.
करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण आता वाढले आहे त्यामुळे खरी परिस्थिती समोर येत आहे .
जर ही परिस्थिती आता आटोक्यात आली नाही तर येत्या काही महिन्यातच आपण साथीच्या टोका पर्यंत येऊ त्यावेळी ही साथ किती पसरली याचा नेमका अंदाज येईल. भारतात आपण केवळ परदेशातून आलेले, संपर्कात आलेले तसेच लक्षणे असलेल्यांची चाचणी करत असून तीही पूर्ण क्षमतेने होताना दिसत नाही. आईसलँड या छोट्याशा देशाने तेथील सक्षम व ज्यांचा कोणत्याही प्रकारे कोणाशीही संपर्क आलेला नाही अशा लोकांची रँडम चाचणी केली. या चाचणीत शून्य पूर्णांक आठ टक्के लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले. विचार करा भारतात जर अशाप्रकारे चाचणीचे निष्कर्ष आले तर किमान एक कोटी लोकांना करोना झालेला दिसेल. अर्थात आज अशी स्थिती नसली तरी येणाऱ्या काळात ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता डॉ अभय बंग यांनी व्यक्त केली. त्यामुळे आज जे चित्र दिसत आहे ते हिमनगाचे टोक असल्याचेही डॉ बंग यांनी सांगितले.
अमेरिकेत साथीच्या जगभरातील स्थितीचा अभ्यास करणारी एक संस्था आहे. चीनमध्ये जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा या संस्थेने जो निष्कर्ष जाहीर केला त्यात म्हटले होते की, या साथीचा मुकाबला करण्याची क्षमता असलेल्या देशांची वर्गवारी केल्यास अमेरिकेचा पहिला नंबर असेल तर दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक ५१ वा असेल. आज अमेरिकेची परिस्थिती सर्वात वाईट आहे तर ब्रिटनचा पंतप्रधान नुकताच अतिदक्षता विभागातून बाहेर आला आहे. या पार्श्वभूमीवर आपण किती तयार आहोत व तयारी करायला पाहिजे याचा नक्कीच आढावा घेऊन पावले टाकायला हवी, असे डॉ अभय बंग म्हणाले. मुंबई, पुण्यातील पालिका व सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांवर आजच कामाचा प्रचंड ताण आहे. त्यांना करोना किट मास्क आदी साहित्य पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. एक नक्कीच आहे त्यांना आवश्यक ती विश्रांती मिळत नाही. सरकारने यासाठी बाँड वरील डॉक्टरांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचा फतवा काढला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याची काटेकोरपणे अमलबजावणीही केली पाहिजे. हे एकप्रकारचे युद्धच आहे. यात डॉक्टरांची भूमिका मोलाची आहे. प्रत्येक तरुण डॉक्टरांनी यात स्वत:हून सहभागी झाले पाहिजे. यातून त्यांना मिळणारा अनुभव अनमोल असेल असेही ते म्हणाले. बांगलादेश युद्धात व १९७२ च्या दुष्काळात मी स्वत: स्वयंसेवक म्हणून काम केले असून त्यावेळी मिळालेला अनुभव खूप मोलाचा होता असे डॉ बंग यांनी सांगितले.
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, मुंबईतील अनेक मोठी रुग्णालये तसेच त्यांचे बाह्यरुग्ण विभाग करोना पेशंटशी डॉक्टर व परिचारिकांचा संपर्क होताच बंद करण्यात आले. हे जर खरे असेल तर या मोठ्या रुग्णालयात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था व अन्य आरोग्य सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत होत्या का हा प्रश्न निर्माण होतो असेही डॉ बंग म्हणाले.