Home चंद्रपूर दखलपात्र :- अडोरे कंपनी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते...

दखलपात्र :- अडोरे कंपनी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते बंडू हजारे यांची मागणी,

 

सुरक्षा उपकरणाच्या अभावाने अपघात होऊन एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीची सफाई करताना अडोरे कंपनीच्या चार कामगारांचा खाली पडून मोठा अपघात झाला असून यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. या कंपनीने सुरक्षेची उपकरणे कामगारांना पुरवली नव्हती त्यामुळे हा अपघात घडल्याने या कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना नेते बंडू हजारे यांनी पत्रकार परिषद घेवून केली आहे.

महाऔष्णिक वीज केंद्रातील संचाच्या सफाईचे काम सुरू होते. अडोरे कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीचे कंत्राटी कामगार संदीप लावडे, छोटेलाल कटरे, विनोद वाळके, सचिन खेरेकर हे यावेळी काम करीत होते. त्यांना सुरक्षेसाठी कंपनीकडून आवश्यक असलेली उपकरणे देण्यात आली नव्हती. अशातच हे कामगार 25 मीटर उंचीवरून खाली कोसळले. या कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी संदीप लावडे या कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाला अजूनही कंपनीकडून कुठलाही मोबदला देण्यात आला नाही. उलट यासाठी कुठल्याही संघटनेकडे तुम्ही गेलात तर जो मोबदला मिळायचा तो देखील मिळणार नाही, अशा धमक्या कंपनीकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला देण्यात येत आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
अडोरे या कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कानुसार वेतन देखील दिले जात नाही. कंत्राटी कामगारांना सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून दिली जात नाही. याची मागणी केली असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते, असा आरोप यावेळी करण्यात आला. कंपनीच्या या धोरणामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अधिक अपघात होत आहेत. त्यामुळे या घटनांसंदर्भात कंपनी आणि मुख्य अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास तेलतुंबडे, सचिव अमोल मेश्राम, युनिट अध्यक्ष प्रफुल सागोरे, युनिट सचिव प्रमोद कोलारकर, मीरा काकडे, विक्रम जोगी, अमोल भट हे उपस्थित होते.

कंपनीचा कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी नकार

या अपघातात गंभीर जखमी झालेले कंत्राटी कामगार देखील उपस्थित होते त्यांनी कंपनीत पुन्हा रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट दिले आहे मात्र कंपनीने त्यांना कामावर घेण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे या कामगारांना समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमची जबाबदारी संपली-  कंपनी व्यवस्थापक राव 

याबाबत अडोरे कंपनीचे व्यवस्थापक राव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कामगारांची कुठलीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. हे कंत्राटी कामगार होते. 76 हजारांचे कंत्राट होते मात्र या कामगारांच्या उपचारासाठी 20 लाखांचा आम्हाला खर्च आला. हे कामगार बरे झाले असले तरी आता आमच्याकडे कुठल्याही कंत्राटी जागा शिल्लक नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कामावर घेऊ शकत नाही असे उडवाउडवीचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here