Home धक्कादायक धक्कादायक :- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून १० पेक्षा जास्त जन ठार, १५० पेक्षा...

धक्कादायक :- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून १० पेक्षा जास्त जन ठार, १५० पेक्षा अधिक लोक बेपत्ता.

अकस्मात झालेल्या ह्या प्रलयामुळे सगळीकडे धावपळ सरकारी यंत्रणा जीव वाचविण्यासाठी व्यस्त.

भूमिपुत्र वेब न्यूज

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठा हिमकडा नदीत कोसळला. हिमकडा कोसळल्यामुळे ऋषीगंगा खोऱ्यातील अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याची पातळी एकदम वाढली आणि पाणी वेगाने पुढे सरकू लागले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहात सापडल्यामुळे शेकडो नागरिक वाहून गेले. आतापर्यंत दहा मृतदेह हाती आले आहेत. उत्तराखंड सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफमधून सर्व मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर केली आहे.
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून १० ठार, १५० बेपत्ता

अद्याप शंभर ते दिडशे जण बेपत्ता आहेत. रेणी गावाला सर्वात मोठा फटका बसला आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. जवळपास १८० शेळ्या-मेंढ्या आणि त्यांना चरायला घेऊन गेलेले पाच जण वाहून गेले आहेत. त्यांच्याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही.

एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक अग्नीशमन दल, स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान, लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाचे पथक, आयटीबीपीचे जवान आणि हवाई दल परस्पर समन्वय राखून मदतकार्यात गुंतले आहे. निवडक गिर्यारोहकांची पथकेही मदतकार्यात सहभागी झाली आहेत. एक मोठी मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
नौदलाचे प्रशिक्षित डायव्हर पाण्यात खोलवर जाऊन बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. ज्या भागातून पाणी उसळत पुढे सरकले त्या भागातील सर्व दरीखोऱ्यांमध्ये तसेच प्रवाहाच्या दोन्ही किनाऱ्यांवर शोध मोहीम सुरू आहे. तपोवन जवळ एका दरीत बोगदा करुन तांत्रिक कामं सुरू होती. पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे तिथे काम करत असलेले सोळा जण अडचणीत सापडले. या सर्वांची आयटीबीपीच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. एका व्यक्तीने बोगद्यातून सुखरुप बाहेर आल्याचे बघून हात वर करुन लगेच आनंद व्यक्त केला.

हवामान विभाग आणि डीआरडीओचा ड्रोन यांच्या मदतीने उत्तराखंडमधील सर्व डोंगररांगाची तातडीने पाहणी सुरू झाली आहे. ज्या भागांमध्ये मोठे हिमकडे कोसळण्याची शक्यता आहे. अशा सर्व भागांपासून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. हिमकड्यांमुळे पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने योग्य ते उपाय केले जात आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
पाण्याची पातळी वाढल्यामुळे ऋषीगंगा नदीवरील १३.२ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प वाहून गेला. प्रकल्पात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा शोध सुरू आहे. तसेच धौलीगंगा नदीवरील तपोवन भागातला एनटीपीसीचा जलविद्युत निर्मिती प्रकल्पही अडचणीत सापडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या संपर्कात आहेत. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिमकडा कोसळल्यानंतर उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट देण्यात आला आहे. अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांचे पाणी उत्तर प्रदेशमध्येही वाहत येते. याच कारणामुळे खबरदारी घेतली जात आहे.
मोठा हिमकडा कोसळण्याच्या घटनेची लगेच पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी आहे. चमोली जिल्ह्यात पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले. याच कारणामुळे मदतकार्य वेगान करुन जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी उत्तराखंडमधील घटनेबाबत शोक प्रकट केला.

जोशीमठ तसेच चमोली जिल्ह्यातील तपोवन येथे तात्पुरत्या हॉस्पिटलची व्यवस्था तातडीने करण्यात आली आहे. दोन्ही हॉस्पिटलमध्ये मेडिकल टीम सज्ज आहेत. जखमींवर उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. श्रीनगर मेडिकल कॉलेज, एम्स ऋषिकेश आणि जॉली ग्रँट हॉस्पिटल यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे काही रस्त्यांची आणि पुलांची पडझड झाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन जवानांनी आवश्यक तिथे तात्पुरते पूल उभारले आहेत. मदतकार्य पूर्ण झाल्यावर तातडीने बांधकाम प्रकल्प हाती घेऊन पायाभूत व्यवस्था पूर्ववत केल्या जातील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी घटनास्थळाचा धावता दौरा करुन मदतकार्याचा आढावा घेतला तसेच राज्याच्या प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन लोकांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री रावत पुढील २४ ते ४८ तासांमध्ये पुन्हा एकदा घटनास्थळाचा धावता दौरा करुन मदतकार्याचा आढावा घेण्याची शक्यता आहे

Previous articleतर महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुका होणार मतत्रिकेवर?
Next articleधक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांनी संपादक राजू कुकडे यांना जीवे मारण्याची पुन्हा दिली सुपारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here