Home चंद्रपूर धक्कादायक :- 30 लाखाच्या खंडणीसाठी जिवंत जाळून शुभमची हत्या.

धक्कादायक :- 30 लाखाच्या खंडणीसाठी जिवंत जाळून शुभमची हत्या.

 

28 दिवसनंतर शुभम फुटाणे अपहरण प्रकरण उघडकीस,

घूग्गूस प्रतिनिधी :-

येथील वेकोलि रामनगर वसाहतीतील इंजिनियरींग शिकत असलेल्या शुभम दिलीप फुटाणे (25) या विद्यार्थ्याचे अपहरण प्रकरण तब्बल महिनाभरानंतर उघडकीस आले असून 30 लाखाच्या खंडणीसाठी त्याची जिवंत जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या हत्या प्रकरणात घुग्घूस येथील गणेश पिंपळशेंडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाची बाब म्हणजे गणेश पिंपळशेंडे यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तो सुद्धा इलेक्ट्रानिक्स इंजिनियरचा विद्यार्थी आहे. काल शनिवारी 13 फेबु्वारी 2021 ला हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

दिनांक 17 जानेवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शुभम हा मित्रांसोबत चंद्रपूर मार्गावरील जायका हॉटेल मध्ये जेवण करायला बाहेर जातो असे सांगून दुचाकीने घरून निघाला होता. रात्री बराच वेळ होऊनही शुभम घरी न पोहचल्याने त्याच्या आईने त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. पण एका अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचे भ्रमणध्वनीवर आईला मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे सांगून 30 लाख रूपये खंडणीची मागणी केली होती. आरोपीने खंडणी दोन दिवसात नाही मिळाली तर मुलाला जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती. तत्काळ या प्रकाराची तक्रार आई वडिलांनी घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 364 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

अपहरणाच्या दुस-या दिवशी सकाळी घुग्घूस येथील डॉ. दास यांच्या रुग्णालयाजवळ शुभमची दुचाकी (क्र. एमएच 34 एएस 6815) रस्त्यालगत आढळून आली होती. सदर दुचाकीवर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले होते. पोलिसांनी रक्ताचे नमुने घेवून तपासाला गती दिली होती. या पुर्वी घुग्घूस येथे 3 नोव्हेंबर 2020 रोजी घूग्घूस येथील व्यावसायिक सनी खारकर यांच्या सात वर्षाच्या वीर नामक मुलाचे अपहरण याच गणेश पिंपळशेंडे ह्या आरोपीने केले होते. परंतु सोशल मिडीयावर या बालकाला वाचविण्यासाठी झालेली जनजागृती आणि पोलिसांच्या दक्षतेने नागपूरातून वीर या बालकाला वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे या प्रकरणातही याच आरोपीवर पोलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे वाहनावंरी रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने साम्य आढळून आल्याने पोलिसांचा संशय खात्रीत बदलला. त्यामुळे आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी उपविभागीय अधिकारी नांदेडकर, घुग्घूसचे ठाणेदार राहूल गांगुर्डे यांनी घुग्घूस लगतच्या स्वागत लॉन जवळील घटनास्थळावर आरोपीला घेवून गेले. त्या ठिकाणी शुभम फुटाणे या विदयार्थ्याचे प्रेत पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मिळाले. फक्त् डोक्याची कवटी तेवढी पोलिसांना हस्तगत करता आली. घटनास्थळावरील परिस्थतीवरून त्याची जाळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा विस्तृत तपास सुरू केला असून हत्येची अधिक माहिती लवकरच पुढे येणार आहे, असे पोलिसांचे म्हणने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here