आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांचा केंद्र सरकारला इशारा!
कोरोना वार्ता :-
सद्ध्या भारतात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांसाठीचं लसीकरण स्थगित केलं आहे.
एकीकडे लसीचा तुटवडा आणि दुसरीकडे जनतेकडून होत असलेली मोठी मागणी यात फसलेल्या केंद्र सरकारने करोना झालेल्या रुग्णांना लस ६ महिन्यांनंतर दिली जावी, असे निर्देश दिले आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात देशातील डॉक्टरांची शिखर संस्था IMA नं आक्षेप घेतला आहे. “करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ६ महिन्यांनतर करोनाची लस देणं हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. या काळात त्यांना पुन्हा या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने या धोरणाचा पुन्हा विचार करावा”, अशी भूमिका आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी मांडली आहे. त्यामुळे करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नेमकी लस कधी घ्यावी? या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.