Home वरोरा व्यक्तीविशेष:- व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांनी तब्बल पंधरा हजारांवर आजतागायत काढली कार्टून्स...

व्यक्तीविशेष:- व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांनी तब्बल पंधरा हजारांवर आजतागायत काढली कार्टून्स व रेखाचित्रे

 

काय आहे व्यंगचित्रकार जयवंत काकडे यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या रेषांचे वास्तव? जाणून घ्या.

वरोरा प्रतिनिधी :-

आपल्या कार्टून्स आणि रेखचीत्राच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडणारे जयवंत काकडे हे रेषांचे अवलिया म्हणूनच ओळखले जातात. त्यांची कार्टून्स महाराष्ट्रातील व बाहेरील शंभरांहून अधिक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचा चित्ररेखाटनाचा प्रवास वयाच्या चौदाव्या वर्षी सुरू झाला. ते कार्टून हा माझा श्वास आहे असेच म्हणतात. ते शाईच्या पेनने रेखाचित्रे अजूनही काढतात. त्यांना समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधणारी नजर लाभली आहे. त्यातून साकार झालेली रेखाटने पाहून मन थक्क झाल्याशिवाय राहत नाही. त्यांची कार्टून सदरे अनेक वर्तमानपत्रांत चालली आहेत. ‘काकड्यांची कोशिंबीर’ हे विनोदी लेखनाचे सदर मागील पंधरा वर्षांपासून ‘मार्मिक’मध्ये सुरू आहे. कार्टून्स शंभराहून अधिक मासिकांत प्रसिद्ध झाली आहेत.त्यांचे वास्तव्य चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे असते. काकडे जगतात साधेपणाने. ते त्यांच्या जुनाट वाड्यात राहतात. ते शहर भागात राहत असूनही त्यांची जवळीक मातीशी आहे. ते सांगतात, ‘मला ग्रामीणपण जपण्यास आवडते.’ काकडे यांनी त्यांच्या नातवंडांसाठी साधेपण कसे प्रयत्नपूर्वक जपून ठेवले आहे हे फार मार्मिकपणे सांगतात.

त्यांनी प्रहसन, विडंबन यांसह मार्मिक भाष्य करणाऱ्या अनेक गद्य-पद्य रचना लिहिल्या आहेत. त्यांची प्रसिद्ध पुस्तके वळण, अॅसेट, उत्सव, पानपट्टी, तदेव लग्नम सुदिनं तदेव, महापूर, चमचेगिरी, सटरफटर, अवयवायण, दुधाची आंघोळ, सर्कस, चिकूमामा आणि इतर कथा, इकडम तिकडम, प्रवास – एक कटकट, रेल चली यांसारख्या नावांची आहेत. त्यांत कथा, कादंबरी, विनोदी साहित्य, कवितासंग्रह, व्यंगचित्रसंग्रह; इतकेच नव्हे, तर बालवाङ्मयसुद्धा आहे. त्यांच्या साहित्याच्या मुखपृष्ठावर त्यांचीच खुमासदार शैलीतील रेखाचित्रे पाहण्यास मिळतात

जयवंत काकडे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी रेखाटन हा छंद जोपासला आहे. ते त्यांचा परखडपणा आणि स्पष्टवक्तेपणा याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांचा तो स्वभावविशेष त्यांच्या निर्भीड लेखनातूनही जाणवतो. त्यांनी काही पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. काकडे यांची प्रस्तावना ‘आनंदवनातील बाबाशाही’ या बहुचर्चित पुस्तकालाही आहे.

ते रेखाचित्रांच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या घडामोडींवर चपखल भाष्य करतात. त्यांचे कसब प्रसंगातील नेमकेपणा हेरणे आणि कार्टूनच्या माध्यमातून तो तितक्याच मिश्कीलपणे व्यक्त करणे आणि त्याची अचूक छाप समाजमनावर सोडणे यामध्ये आहे. त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन रा.पै. समर्थ स्मारक समिती (नागपूर) यांच्या ‘विदर्भरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

काकडे यांनी वयाची ऐंशी वर्षे पार केली आहेत. मात्र त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मुंबई विद्यापीठाचा जर्मन विभाग आणि मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात अन्य भाषकांना मराठी शिकवण्यासाठी सुरू केलेल्या ग्रंथरूप ‘माय मराठी’ या अभ्यासक्रमात जयवंत काकडे यांच्या एका सामाजिक आशयाच्या व्यंगचित्राचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here